गडचिरोली : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. यात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असा दावा केल्याने ऐन निवडणुकीत खळबळ उडाली आहे. यावर वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर देत दावा तथ्यहीन असल्याचे सांगितले.

गडचिरोली-चिमूर लोकसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तर महायुती कडून मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे चित्र आहे. दरम्यान, बुधवारी मंत्री आत्राम यांनी विजय वडेट्टीवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केल्याने पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. वडेट्टीवारांच्या प्रवेशासंदर्भात झालेल्या बैठकीत मी स्वतः उपस्थित होतो, असे आत्राम यांनी स्पष्ट केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा उधाण आले आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा…सरसंघचालक डॉ. मोहन भागवत मेहकरात! स्वयंसेवकांना कानमंत्र

आत्राम यांची ‘नार्को’ टेस्ट करा – वडेट्टीवार

महायुतीला पराभव समोर दिसत असल्याने त्यांचे नेते काहीही दावे करत सुटले आहे. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना पराभव झाला की मंत्रिपद जाईल याची भीती आहे. त्यामुळे ते मला त्रास देण्यासाठी असा दावा करीत आहे. ते जर खरंच कथित बैठकीत हजर होते तर त्यांची ‘नार्कोटेस्ट’ करा, सत्य काय ते समोर येईल. आत्राम यांनी स्वतःच्या क्षेत्रातून भाजपला लीड मिळवून द्यावे असे आव्हान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.