यवतमाळ : शिकवणी वर्गातील अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत जवळीकता निर्माण करून शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केले. यात पीडिता गर्भवती राहिली. शिक्षकाने विद्यार्थिनीला गर्भपातासाठी गोळ्यांचा ओव्हर डोस दिल्याने प्रकृती खालावून विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे घडली. या प्रकरणी आरोपी संदेश गुंडेकर (२७) हल्ली मुक्काम ढाणकी याला पोलिसांनी अटक केली.

उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील गुंडेकर कोचिंग क्लासेसच्या संचालक शिक्षकाने आपल्याच शिकवणी वर्गातील एका१६ वर्षीय विद्यार्थनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने वारंवार क्लासरूममध्येच तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. ही घटना १ डिसेंबर २०२४ ते १९ सप्टेंबर २०२५ दरम्यान घडली.

पीडिता त्यात चार महिन्याची गर्भवती राहिली. त्यानंतर शिक्षकाने विद्यार्थीनीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. गोळ्यांचा डोस अती झाल्याने तिची प्रकृती खालावली. अती डोसमुळे तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला उपचारासाठी पुसद येथील लाइफ लाईन या खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हे गर्भपाताचे प्रकरण असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ पुसद पोलीस ठाण्यात माहिती दिली. सहायक पोलीस नरीक्षक प्रेम केदार यांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने रुग्णालयात दाखल होत पीडित मुलीचा जबाब नोंदविला. त्यावरून आरोपी शिक्षक संदेश गुंडेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान मुलीची प्रकृती खालावल्याने तिला पुढील उपचारासाठी नांदेड येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर ढाणकी शहरात प्रचंड खळबळ उडाली. पुसद पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचाराचा हा गुन्हा सोमवारी बिटरगाव पोलिसांकडे वर्ग केला. शिक्षक संदेश गुंडेकर हा मूळचा मराठवाड्यातील रहिवासी आहे.

तो काही वर्षांपासून ढाणकी येथे खासगी शिकवणी वर्ग चालवत आहे. घटनेनंतर तो आपल्या गावी पळून गेला. बिटरगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे त्याला भोकर येथून अटक केली. शिक्षकाविरोधात विविध कलमांसह पॉक्सो कायद्यांतर्गत अंतर्गत गुन्हा नोंद केला. पुढील तपास ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार करत आहेत. या घटनेने ढाणकी शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी गुंडेकर शिकवणी वर्गाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.