लोकसत्ता टीम

नागपूर : एका कारमधून तरुणीची आरडाओरड येत असून त्यामध्ये काही तरुण तिचे अपहरण करीत असल्याची माहिती काही नागरिकांनी कपीलनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी या घटनेला गांभीर्याने घेत सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणि पोलीस नियंत्रण कक्षाच्या मदतीने त्या कारचा पाठलाग केला. तरुणीसह तरुणांना ताब्यात घेतले. त्यांनी आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी असून फिरायला जात असल्याचे सांगितले. गंमत-जंमत करीत असताना आरडाओरड केल्याची कबुली तरुणीने पोलिसांकडे दिली. त्यामुळे पोलिसांनी तरुणीसह तरुणांना सूचनापत्र देऊन सोडले. मात्र, घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली होती. तसेच कपीलनगर पोलीस आणि नियंत्रण कक्षातील कर्मचारी कामाला लागले होते.

दोघेही बीएस्सी व्दितीय वर्षाला आहेत. ते चांगले मित्र आहेत. शुक्रवार १० जानेवारीला सायंकाळच्या सुमारास दोघेही कारने फिरायला निघाले. मित्र असल्याने त्यांच्यात गंमती-जमती आणि आरडा-ओरड सुरू होती. कार भरधाव वेगात कपीलनगर परिसरातून जात असताना ती अचानक ओरडली. तरूणीची आरडा-ओरड ऐकून रस्त्याने जाणारे आणि परिसरातील नागरिकांना तिचे अपहरण झाल्याचे वाटले आणि स्थितीही तशीच होती. परिसरात तिच्या अपहरणाची चर्चा परसरली.

आणखी वाचा-ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, विरोधकांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेसंदर्भातील माहिती कपीलनगर पोलिसांपर्यंत पोहोचली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता लगेच ‘बीट मार्शल’ अश्वीन जाधव यांना सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सांगितले. त्या माध्यमातून पोलीस पथकाने कार शोधली. कार चालक आणि मैत्रिणीची विचारपूस केल्यानंतर ही केवळ गंमत आहे. आम्ही चांगले मित्र आहोत, हे शब्द ऐकल्यावर पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. पोलिसांनी त्याला सूचनापत्र देऊन यानंतर रस्त्यावर असा प्रकार व्हायला नको असे बजावून सांगितले. परंतु, परिसरात अपहरणाची चांगलीच चर्चा रंगली होती. ते अपहरण नसले तरी सूचना मिळताच पोलीस घटनेची गांभीर्याने दखल घेतात की नाही, हे या घटनेवरून स्पष्ट झाले. कपीलनगर पोलिस सतर्क असल्याचा हा परिचय दिला आहे. या प्रकारामुळे पोलिसांचा जीव मात्र बराच वेळपर्यंत भांड्यात पडला होता.