अकोला: अमरावती विभागात बारावी परीक्षेच्या निकालात वाशीम जिल्हा अव्वल ठरला आहे. वाशीमचा ९५.६६ टक्के निकाल लागला असून विभागात जिल्हा प्रथम आहे. बारावी परीक्षेच्या निकालात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली. ९७.०५ टक्के मुली, तर ९४.६४ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील मिताली काबरा हिने ९९ टक्के गुण प्राप्त केले. मिताली राज्यात अव्वल असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २़०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल दुपारी १ वाजता संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. वाशीम जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेसाठी एकूण २० हजार ६८८ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी २० हजार ५७६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यातील ९५.६६ टक्के म्हणजेच १९ हजार ६८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

त्यामध्ये ११ हजार २६९ मुले, तर आठ हजार ४१४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. वाशीम जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ९७.१५ टक्के निकाल वाशीम तालुक्याचा लागला. मालेगाव ९६.२९, रिसोड ९७.११, कारंजा ९०.८९, मंगरुळपीर ९४.४४ व मानोरा तालुक्याचा ९३.६१ टक्के निकाल लागला आहे.

दरम्यान, वाशीम तालुक्यातील तोंडगाव येथील मिताली मनीष काबरा हिने बारावी परीक्षेत ६०० पैकी ५९४ (९९ टक्के) गुण प्राप्त केले. इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालात मिताली ही राज्यात अव्वल असण्याची शक्यता आहे. मिताली ही तोरणाळा येथील ममता इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आहे. मिताली हिला विज्ञान शाखेत ९९ टक्के गुण मिळाले. दहावीमध्ये तिने आयसीएसई मंडळातून ९८.६० टक्के गुण मिळवले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मॅप ॲण्ड कॉम्प्युटिंग’ क्षेत्रात करणार करिअर

मितालीचे वडील मनीष हे मूळ तोंडगाव येथील असून ते सध्या छत्रपती संभाजीनगर येथे सनदी लेखापाल आहे. मितालीची आई शिल्पा काबरा संगणक अभियांत्रिकीमध्ये पीएच.डी. केली आहे. त्या सुद्धा छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मितालीला पुढील शिक्षण ‘मॅप ॲण्ड कॉम्प्युटिंग’ या क्षेत्रात करिअर करायचे आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई वडील आणि आजोबा राजेश लढ्ढा यांच्यासह कुटुंबियांना दिले. या यशाबद्दल मितालीचे सर्वत्र कौतुक होत आहे.