अमरावती : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे अमरावती हे जन्मगाव. याच ठिकाणी त्यांचा पहिला सत्काराचा कार्यक्रम घडून यावा, ही अनेकांची इच्छा फलद्रूप होण्याचा दिवस जवळ आलेला. त्यासाठी अमरावती वकील संघाची लगबग सुरू असताना गेले दोन दिवस अमरावतीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार संजय खोडके यांनी रक्तदान करून अनेकांना सुखद धक्का दिला.
अमरावती वकील संघाच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन येत्या बुधवारी २५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता पी.आर. पोटे अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद सभागृहात करण्यात आले आहे. या निमित्ताने सरन्यायाधीश भूषण गवई यांची रक्ततुला करण्याचे नियोजन आहे.
संजय खोडके यांनी येथील बार कौन्सिलच्या सभागृहात आयोजित रक्तदान शिबिरात स्वत: रक्तदान केले. कुठल्याही विधायक कार्याला सामाजिक बांधिलकीची जोड द्यायची असेल, तर रक्तदाना सारखे मोठे कार्य नाही. रक्तदानातून सामाजिक ऋण फेडण्याची संधी मिळते. अमरावतीचे सुपूत्र न्यायमूर्ती भूषण गवई यांना देशाचे सरन्यायाधीश होण्याचा बहुमान मिळणे, ही अमरावतीसाठी गौरवाची बाब असून रक्ततुला करून त्यांच्या सत्कार करणे, हा उपक्रम समाजात नवा आदर्श प्रस्थापित करणारा आहे, असे संजय खोडके यांनी सांगितले. यावेळी कमलताई गवई, रक्तदान समितीचे अध्यक्ष महेंद्र भुतडा, अमरावती वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सुनील देशमुख, सचिव ॲड अमोल मुरळ, अधिवक्ता ॲड. प्रशांत देशपांडे, रक्तदान शिबीर आयोजन समितीचे समन्वयक ॲड. किशोर शेळके प्रामुख्याने उपस्थित होते.
२५ जून रोजी सरन्यायाधीशांचा सत्कार
न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सरन्यायाधीश म्हणून आपला पहिला सत्कार स्वत:च्या गावी स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भूषण गवई यांनी सुरुवातीच्या काळात ज्येष्ठ अधिवक्ता राजाभाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्हा न्यायालयात वकील म्हणून १९८५ ते १९८६ या दरम्यान काम केले आहे. यामुळे जिथून आपल्या कामाची सुरुवात झाली, त्या अमरावती न्यायालयातील वकील संघाच्या सत्कार सोहळ्याला त्यांनी पहिला मान दिला आहे, असे अॅड. सुनील देशमुख यांनी सांगितले. सोहळ्याला उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती प्रवीण पाटील आणि अमरावतीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा हे उपस्थित राहणार आहेत.