गडचिरोली : न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला.यामुळे राज्यात राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल दीडशेहून अधिक राजकीय पदाधिकाऱ्यांचा प्रवेश घडवून आणल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
एक जुलै रोजी मुंबई येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासमोर जिल्ह्यात अजित पवार गटाला बळ मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत महायुतीत गेलेल्या नेत्यांमध्ये गडचिरोलीतील ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम हेही होते. मागील सरकारमध्ये त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली होती. मात्र, विद्यमान सरकामध्ये त्यांना स्थान देण्यात आले नाही. अडीच वर्षानंतर बघू असा संदेश मात्र त्यांना देण्यात आला होता. त्यामुळे नाराज आत्राम काही काळ शांत होते.
परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या मार्ग मोकळा होताच त्यांनी एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सिरोंचापासून कोरचीपर्यंतच्या विविध पक्षातील दीडशेहून अधिक पदाधिकारी आणि नेत्यांचा मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश घडवून आणला. यामध्ये नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्ह्यातील महत्वाच्या नेत्यांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे एकेकाळी दक्षिण गडचिरोलीत प्राबल्य असलेल्या आदिवासी विद्यार्थी संघाला यामुळे मोठा धक्का बसलेला आहे. तत्पूर्वी जिल्ह्यातील आणखी काही मोठे नेते प्रवेश देखील अजित पवार गटात प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र त्यांचा प्रवेश लांबणीवर पडला आहे. इतर राजकीय पक्षांमध्ये या प्रवेश सोहळ्याची बरीच चर्चा सुरु आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वांचच कस लागणार आहे.
मोठे नेतेही अजित पवार गटाच्या वाटेवर?
मधल्या काळात बदललेल्या राजकीय समीकरणामुळे गडचिरोलीतील काही नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. यामुळे जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळवण्यासाठी जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील दोन महिन्यात आणखी काही मोठे नेते अजित पवार गटात प्रवेश करू शकतात. त्यात काँग्रेस आणि शरदचंद्र पवार गटाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे अजित पवार गट आणि भाजप एकत्र लढणार की स्वतंत्र, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.