मृत्यूप्रकरणी नुकसान भरपाई संदर्भात मराठीला नाही तर फक्त इंग्रजी किंवा हिंदी भाषेतीलच दस्तावेज स्वीकारू अशी भूमिका नागपुरातील यूनियन बँक ऑफ इंडियाने घेतली आहे.त्याविरुध्द मनसेने आंदोलन केले.
घरातील एकमेव कमावत्या तरुणाच्या मृत्यूनंतर नुकसानभरपाई मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या त्याच्या गरीब कुटुंबाची जर भाषेपायी अडचण केली जात असेल, तर तुम्ही काय म्हणणार? जर कागदोपत्री पुरावे ( पोलीस एफ आय आर) मराठीत आहे, फक्त या कारणासाठी तरुण मुलगा गमावलेल्या कुटुंबाला मुलाच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या नुकसानभरपाईच्या हक्कापासून वंचित ठेवले जात असेल, तर तुम्ही काय म्हणणार? भाषेपायी अशी संतापजनक अडवणूक नागपूरच्या बोपचे कुटुंबीयांची केली जात आहे. हे वर्तन यूनियन बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेकडून केले जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
नागपूरच्या योगेश बोपचे या तरुणाचा ८ जूनच्या पहाटे एका रस्ते अपघातात मृत्यू झाला. योगेशचा कुठलाही जीवन विमा नसल्यामुळे त्याची पत्नी आणि दोन मुलं उघड्यावर पडले. एका सुशिक्षित कौटुंबिक मित्राने राष्ट्रीयकृत बँकेत बँक खाते आणि त्याचा एटीएम कार्ड असल्यास रस्ते अपघाताच्या मृत्यू संदर्भात दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई पीडित कुटुंबीयांना मिळू शकते अशी माहिती दिली.
ही माहिती मिळाल्यानंतर दिवंगत योगेशचा लहान भाऊ लोकेश बोपचेने युनियन बँक ऑफ इंडियामध्ये संपर्क साधले. बँकेने सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता करत योगेश बोपचेच्या मृत्यू संदर्भात दोन लाख रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी अर्ज सादर करण्याचे प्रयत्न सुरू केले.
मराठीतील पोलिस एफ आय आर मान्य नाही
मात्र, गेले दोन आठवडे युनियन बँक ऑफ इंडियाचे अधिकारी त्या अर्जावर कार्यवाही करत नाहीत. योगेशच्या मृत्यू संदर्भातला नागपूरच्या बेलतरोडी पोलिस स्टेशनचा एफ आय आर मराठी भाषेत आहे, फक्त या हास्यास्पद कारणापायी लोकेशचा अर्ज स्वीकारत नाहीत.
पोलिस FIR मधील अपघाताचा तपशील मराठीत नमूद आहे, त्याचे इंग्रजी किंवा हिंदी भाषांतर करून तो नोटराईज्ड करा आणि प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात ते सादर करा. तेव्हाच आम्ही तुमचा अर्ज स्वीकारू असं आडमुठे धोरण बँकेच्या अधिकाऱ्यांनी घेतलं आहे.
केवळ भाषेच्या कारणामुले गेली दोन आठवडे लोकेश त्याच्या भावाच्या मृत्यूनंतर मिळू शकणाऱ्या नुकसान भरपाई संदर्भातला अर्ज हातात घेऊन युनियन बँक ऑफ इंडियाच्या सेमिनरी हिल्स शाखा आणि बेलतरोडी पोलिस स्टेशन दरम्यान हेलपाटे घालत आहे.
विमा कंपनीकडून क्लेम नाकारण्याची भीती
संबंधित बँकेत संपर्क साधले. मात्र, एफ आय आर चा तपशील मराठीत असल्यास नुकसान भरपाईचा क्लेम विमा कंपनीकडून नाकारला जाईल. नुकसान भरपाई देणारी विमा कंपनी फक्त इंग्रजी किंवा हिंदी मध्येच दस्तावेज स्वीकारते. त्यामुळे FIR ची इंग्रजी किंवा हिंदीमध्ये भाषांतर झालेली आणि नोटराईज केलेली प्रतच आम्ही अर्जासोबत स्वीकारू शकतो असं उत्तर बँकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं.