अमरावती : मराठी भाषेच्या लढ्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काढलेल्या ‘सातबारा कोरा यात्रे’ला पाठिंबा जाहीर केला असून मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे गुरूवारी १० जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील लालखिंड येथे बच्चू कडू यांच्या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.
बाळा नांदगावकर हे पदयात्रेत प्रत्यक्ष सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या यात्रेला पाठिंबा दर्शविणार आहेत, अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षातर्फे देण्यात आली आहे.
देशाचे माजी कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ‘७/१२ कोरा कोरा कोरा’ यात्रेला गेल्या ७ जुलै पासून सुरुवात झाली. उंबर्डा बाजार, मानकी, वळसा, तिवरी, तुपटाकळी, काळी दौलत, गुंज अशी गावे करत चिलगव्हाण या स्व. साहेबराव करपे यांच्या गावामध्ये या यात्रेची सांगता होणार आहे. पहिल्या शेतकरी आत्महत्येची नोंद या गावी झाली होती.
सुमारे १३८ किमीच्या या यात्रेत शेतकरी, विविध पक्षातील कार्यकर्ते सरकारने सातबारा कोरा केलाच पाहिजे, अशी मागणी करीत मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. १४ जुलै रोजी चिलगव्हाण येथे या यात्रेची जाहीर सांगता सभा होणार आहे. १४ जुलैला अंभोऱ्यात होणाऱ्या सभेसाठी तुम्ही रिकाम्या हाताने नाही, तर रूमने आणि लाठ्या-काठ्या घेऊनच या असा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
दारव्हा तालुक्यातील तळेगाव येथे आयोजित सभेत बच्चू कडू यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला. ते म्हणाले, आता घोषणा पुरेशा नाहीत, आता कृती हवी. सरकारला वठणीवर आणायचं असेल, तर रस्त्यावर उतराव लागेल, तेही निर्धाराने आणि ताकदीने. वसंतराव नाईक हे केवळ मुख्यमंत्री नव्हते, तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे देव होते. त्यांनी जेव्हा रोजगार हमी योजनेची कल्पना दिली, तेव्हा लाखो गरिबांना पोटभर अन्न मिळाले.
आज तेच सरकार त्यांच्या वारशाचा अपमान करत आहे ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे पाणी बंद, वीज बंद, अनुदान थांबले, विमा कंपन्यांच्या लुटीला संरक्षण हे सहन करायचे असेल तर आपण मृत समजून घ्यावे. पण आम्ही शेतकऱ्यांनी जगायचे ठरवले आहे. झुंजून, लढून आणि सरकारला गुडघ्यावर आणूनच ही पदयात्रा थांबेल, असेही ते म्हणाले.