विक्री अर्ध्यावर, उलाढालही मंदावली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : जानेवारीच्या सुरुवातीपासूनच बच्चे कंपनीसह थोरांना वेध लागतात ते पतंग उडवण्याचे. संपूर्ण महिन्यात नागपूरच्या आकाशात पतंगचे युद्ध बघायला मिळते. शहरभर ‘ओकाट’ आणि ‘ओपार’ च्या आरोळ्या ऐकू येतात. मकरसंक्रांतीला तर पतंग उडवण्याला उधाणच येते. मात्र यंदा मकरसंक्रांतीच्या दिवसातही आकाशात पतंग कमी प्रमाणात दिसत आहेत. त्याचे कारण पतंगच्या वेडाने भारावून जाणारी मुले आता स्मार्टफोनवरील पब्जी आणि इतर गेम्सच्या नादी लागली आहेत. त्यामुळे पतंग उडवण्याचा उत्साह मावळला असून पतंग विक्रीचा व्यवसाय अगदी अर्ध्यावर आला आहे. परिणामी, बाजारातील उलाढाल कमी झाली आहे. मोबाईल गेममुळे पतंगांची सध्या ओकाट झाल्याचे चित्र आहे.

नागपुरात मकरसंक्रांत पतंग उडवणाऱ्या शौकिनांसाठी उत्सवच असतो. नवे वर्ष सुरू होताच बाजारात सर्वत्र विविध आकारांच्या आणि रंगीबेरंगी पतंग विक्रीची दुकाने सजतात. लहान मुले पतंग व चक्री घेण्यासाठी हट्ट करतात. मकरसंक्रांतीच्या पूर्वीपासून अवघे आकाश पतंगांनी व्यापले जात असे. मात्र यंदा पतंगांच्या बाजारात हवी तशी लगबग दिसून येत नसून आकाशातही पतंगांची संख्या कमी झाल्याचे दिसते. त्याचे मुख्य कारण आहे स्मार्टफोन. आजच्या मुलांना स्मार्टफोनचे वेड लागल्याने ते पब्जी आणि इतर गेम खेळण्यात दंग झाले आहेत. आता ही मुले मोबाईलवरच पतंगचा खेळ खेळत आहेत. यामुळे त्यांनी खऱ्याखुऱ्या पतंगकडे पाठ फिरवली आहे. परिणामी, पतंग  बाजारातही सध्या मंदीचे वातावरण आहे. लहान-थोर मोबाईलमध्येच आपला वेळ घालवत आहेत. त्यामुळे पतंगचा आनंद घेणारे कमी झाले आहेत. मकरसंक्रांतीमध्ये दरवर्षी नागपूरच्या पतंग बाजारात दररोज पाच लाखांचा व्यवसाय व्हायचा. यामध्ये पाच रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंतच्या पतंगची मोठी मागणी असायची. एक ग्राहक दिवसातून दहावेळा दुकानाला भेट द्यायचा. बरेली मांजा आणि कॉटनच्या मांज्याची मागणीही तेवढीच असायची. मात्र यंदा बाजारातील व्यवसाय अर्ध्यावर आला आहे. व्यापाऱ्यांनी याचा अंदाज घेत माल कमी प्रमाणात आणला आहे. नागपुरात कोलकाता, अहमदाबाद, कानपूर, दिल्ली येथून कागदी पतंग येत असून यंदा मात्र त्या कमी आणण्यात आल्या आहेत. व्यापारी सांगतात, गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने पतंगची मागणी कमी होत आहे. नागपुरातील गेल्या ३५ वर्षांची ही परंपरा आता मोडीत निघाली आहे. चार महिन्यांचा हा उत्सव आता केवळ एक दिवसावर आला आहे. पूर्वी जनेवारीपासून जुन्या नागपूर शहरात प्रत्येक घराच्या वर मुलांचा एकच घोळका पतंग उडवताना दिसायचा. मात्र आता तो केवळ एक दोन दिवस दिसतो.

आता पंतगांच्या व्यवसायात काहीच उरले नाही. पारंपरिक व्यवसाय असल्याने तो कसाबसा सुरू आहे. मोबाईल गेम्स्मुळे मुले पतंग उडवण्यापासून दुरावले जात आहेत. व्यवसाय अर्ध्यावर आला आहे. पब्जी खेळत मुले पतंग खरेदीला येतात आणि दोन चार पतंग घेतल्यावर परत येत नाहीत. चार महिने चालणारा हा उत्सव एक दिवसापुरता साजरा होत आहे.

– राकेश शाहू, पतंगचे ठोक विक्रेते जुनी शुक्रवारी

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile game hit kite sales zws
First published on: 15-01-2020 at 04:28 IST