नागपूर: भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उदध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानाकडून आगळीक होण्याची शक्यता लक्षात घेऊन सशस्त्र दल सतर्क आहे. तसेच देशभरातील विमानतळ आणि महत्वाचे आस्थापनांची देखील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येत आहे.

नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी ’हाय इंटेंसिटी मॉक ड्रिल’ आयोजित करण्यात आली. सुरक्षेच्या तयारीचा एक भाग म्हणून संपूर्ण विमानतळाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानमधील लाहोर विमानतळाजवळ स्फोट झाला आहे. त्यानंतर हा सराव करण्यात आला आला. त्यामुळे या भागातील विमानतळांवर सतर्कता वाढविण्यात आली आहे. ही मॉक ड्रील गुरुवारी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी झाली. सुमारे दहा मिनिटे चाललेल्या या मॉक ड्रीलच्या वेळी संपूर्ण विमानतळ खाली करण्यात आले.

विमानतळ निर्मनुष्य केल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) ‘टर्मिनल बिल्डिंग इव्हॅक्यूशन ड्रिल’ केले. या मॉक ड्रिल आपत्कालीन तयारी आणि उच्च-सुरक्षा अलर्ट परिस्थितीत आंतर-एजन्सी समन्वयाचे मूल्यांकन करणे हे उद्दीष्ट होते. या सरावानंतर अधिकाऱ्यांकडून विमानतळावरील कर्मचाऱ्यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या समजावून सांगण्यात आले. संभाव्य धोके, सुरक्षा आणि तत्परता सुनिश्चित करण्यासाठी अशा सरावांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी परिसंवाद आयोजित केले होते.

दरम्यान, आपत्कालीन सायरन सक्रिय होताच विमानतळ टर्मिनलमधील सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. रिअल टाइम इमर्जन्सी रिस्पॉन्सचे अनुकरण करत विमानतळाच्या कर्मचाऱ्यांनना जलद आणि सुनियोजित पद्धतीने परिसराबाहेर नेण्यात आले.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) या सरावाचे आयोजन केले होते. यात दहशतवादी हल्ला किंवा स्फोट झाल्यास कर्मचाऱ्यांनी घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. संकटकाळात विमानतळ अधिकाऱ्यांची तयारी आणि समन्वयाचे मूल्यमापन करणे हा त्यामागचा उद्देश होता.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) गुरुवारी नागपूर विमानतळावर मॉक ड्रिक केले. सर्व भारतीय विमानतळांवर कडक सुरक्षा व्यवस्थेत हा सराव करण्यात आला. या सरावात सीआयएसएफच्या क्यूआरटी टीमसह त्यांचे कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते. सायरन वाजल्यानंतर विमानतळावरील कर्मचाऱ्यांना तेथून बाहेर पडून ठराविक ठिकाणी जमण्याचे निर्देश देण्यात आले. या सरावादरम्यान सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावरील कर्मचाऱ्यांना प्रतिकूल परिस्थिती किंवा लष्करी संघर्षादरम्यान पाळल्या जाणाऱ्या सुरक्षा प्रोटोकॉलची माहिती देण्यात आली.