नागपूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत महिलांसाठी केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने ‘स्टेट्स ऑफ वुमन्स इन इंडिया’ या राष्ट्रव्यापी अध्ययनाच्या अहवालाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते

गुरुवारी करण्यात आले. यावेळी राज्यपाल बोलत होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्यपालांनी अर्धा वेळ केंद्र सरकारच्या विकासकामांची माहिती दिली. आपल्या २० मिनिटांच्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमने उधळली. गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी वीज, शौचालय, गॅस सिलिंडर दिले. येत्या काळात सरकार प्रत्येकाला घरही देणार आहे, असेही ते म्हणाले.

राज्यपालांनी आपल्या भाषणातून सरकारच्या विकासकामांचा पाढा वाचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. लोकसभा निवडणुकीआधी राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनी प्रचारसभेत नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हायला हवे, असे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात कठोर कारवाईसाठी राष्ट्रपतींकडे तक्रार करण्यात आली होती. आता महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोदी सरकारवर स्तुतीसुमनांचा वर्षांव केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याचे संकेत आहेत.