संजय मोहिते, लोकसत्ता

बुलढाणा : एकसंघ शिवसेना केंद्रातील ‘एनडीए’मध्ये असताना विख्यात कृषितज्ज्ञ डॉ. स्वामिनाथन यांना राष्ट्रपती करावे, अशी शिफारसवजा सूचना आम्ही केली होती. मात्र, मोदी सरकारने ती नाकारली, असा गौप्यस्फोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मोदी सरकारने त्याऐवजी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती केले, याचे कारण त्यांना ‘रबर स्टँप’ हवा होता, अशी टीकाही त्यांनी केली.

मोताळा येथे आज संध्याकाळी पार पडलेल्या सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह शिवसैनिक व नागरिक बहुसंख्येने हजर होते.

आणखी वाचा-“…तर रवी राणांची बायको त्यांना निवडणुकीपूर्वी सोडून जाणार,” ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचे अजब विधान

यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, सरकारने स्वामिनाथन यांना आता भारतरत्न जाहीर केला, मग केंद्र सरकार त्यांच्या शिफारसी का स्वीकारत नाहीत? पुलावामा घटनेची चौकशी का करत नाही? आमचे हिंदुत्व घरातील चूल पेटविणारे तर भाजपचे हिंदुत्व घर पेटविणारे आहे. बाबरी पडली तेव्हा हे पळून गेले, त्यांची शेपटी दोन पायांच्या मध्ये होती, अशी टीका त्यांनी केली. त्यांचे हिंदुत्व बेगडी असल्याचे सांगून अयोध्या मंदिर लोकार्पणाप्रसंगी शंकराचार्य का नव्हते? असा प्रश्न त्यांनी केला.

भ्रष्टाचारी जेवढा मोठा तेवढा त्याला जास्त मान, अशा पद्धतीने प्रफुल्ल पटेल, अजित पवार यासारख्या नेत्यांना भाजप बरोबरीचा मान देते. मात्र, असा मान शंकराचार्यांना का नाही? ज्यांच्यावर गंभीर आरोप केले ते आज भाजपसोबत आहेत, ही मोदींची गॅरंटी आहे, अशी खिल्ली त्यांनी उडविली.

आणखी वाचा-शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर… उपचाराला जायचे असल्यास…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुलावामा हल्ल्याची चौकशी का नाही?

पुलवामाप्रकरणी तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक हे सत्य बोलले म्हणून आता त्यांच्याविरुद्ध ‘ईडी’ची कारवाई करण्यात येत आहे, असा गंभीर आरोप करून केंद्राने पुलवामा घटनेची चौकशी का केली नाही? असा सवाल ठाकरे यांनी केला. आम्ही सत्तेत आलो तर मिंदे सरकारमधील गुंड आमदारांना तुरुंगात डांबू, असा इशाराही त्यांनी दिला.