नागपूर : भाषा, धर्म, जीवनशैली, खानपान, संस्कृती यांतील वैविध्य प्रत्येकासाठी वैशिष्ट्यपूर्ण आणि गौरवास्पद असते. मात्र, ही विविधता आपल्यातल्या भेदाचे कारण बनता कामा नये, असे ठाम प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यात भागवत यांनी ‘हिंदू समाज सर्वसमावेशक असून ‘ते आणि आपण’ या भेदाच्या मानसिकतेपासून कायम मुक्त राहील’ याचा पुनरुच्चार केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमीचा सोहळा गुरुवारी नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू धर्म, भारत, आंतरराष्ट्रीय धोरणे, अमेरिकेने लादलेली करवाढ , नेपाळ व बांगलादेशमधील सद्य:स्थिती, सोनम वांगचुक यांना झालेली अटक, पहलगाममधील दहशतवादी हल्ला यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये देशातील सामाजिक एकता हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचे सांगत ते म्हणाले,‘भारतात अनेक भाषा, पंथ, खानपान, राहणीमान, जीवनशैली, जाती, उपजाती खूप आधीपासून आहेत. भारतीय परंपरेने या सगळ्यांचे स्वागत आणि स्वीकार केला आहे. मात्र, असे वैविध्य असतानाही आपण सगळे एका मोठ्या समाजाचे घटक आहोत. समाज, देश, संस्कृती आणि राष्ट्र या नात्याने एकत्र आहोत. आपली हीच ओळख सर्वोच्च आहे, हे आपल्याला कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपले परस्परांशी नाते सौहार्दपूर्ण आणि संयमी असायला हवे. परस्परांच्या श्रद्धा, महापुरुष आणि प्रार्थनास्थळे यांचा अपमान होणार नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी.’

क्षुल्लक कारणांनी रस्त्यावर उतरून कायदा हातात घेणे किंवा हिंसाचार करणे ही प्रवृत्ती चुकीची असल्याचे सांगताना ‘विशिष्ट समुदायाला भडकवण्यासाठी नियोजनपूर्वक शक्तिप्रदर्शन घडवून आणण्याची प्रवृत्ती रोखायला हवी’ अशी अपेक्षा भागवत यांनी व्यक्त केली. ‘हिंदू समाज सर्वसमावेशक असून ‘वसुधैव कुटुंबकम’ या उदार विचारसरणीचा पुरस्कर्ता आहे. त्यामुळे माणसामाणसांत भेद निर्माण करणाऱ्या ‘ते आणि आपण’ या मानसिकतेपासून हा समाज नेहमी मुक्त राहील’ असा विश्वास भागवत यांनी व्यक्त केला.

अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी स्वावलंबन हाच पर्याय

देशाची आर्थिक प्रगती होत असली तरी श्रीमंत आणि गरीब यांमधील दरी वाढत आहे. आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण झाले आहे. अमेरिकेने स्वार्थासाठी अलीकडेच लागू केलेले आयात शुल्क धोरण आपल्याला पुनर्विचार करण्यास भाग पाडणारे आहे. जग परस्परावलंबनावर चालते. पण वैश्विक एकता लक्षात घेऊन स्वावलंबी होणे आवश्यक आहे. दुसऱ्या देशांवरील निर्भरता कमी करण्यासाठी स्वदेशी, स्वावलंबनाला दुसरा पर्याय नाही असे सरसंघचालक म्हणाले.

संविधानामुळे सर्वोच्चपद : रामनाथ कोविंद

या सोहळ्याचे प्रमुख अतिथी असलेले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, ‘मी आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास वर्गातील आहे. पण मी भारताच्या सर्वोच्च संवैधानिक पदावर पोहोचू शकलो, याचे श्रेय संविधानातील सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना आहे. डॉ. आंबेडकर आणि डॉ. हेडगेवार हे दोघेही माझ्या जीवनाचे खरे प्रेरणास्थान आहेत. संघात जात, धर्म यांचे कोणतेही भेद नाहीत. ही संघाची खरी ताकद आहे.”

विकासाच्या धोरणांचा पुनर्विचार व्हावा

भौतिक आणि उपभोगवादी विकासाच्या नीतीचे दुष्परिणाम अधिकाधिक प्रमाणात उघड होत असल्याचे सांगताना भागवत यांनी अशा विकास धोरणांचा पुनर्विचार करण्याची गरज यावेळी व्यक्त केली. भारतात अलीकडच्या काळात अनियमित पाऊस आणि अतिवृष्टी, भूस्खलन, हिमनद्या कोरड्या पडणे यांसारख्या घटना घडत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. विकास प्रकल्पांमुळे नैसर्गिक संकटे वाढत असतील तर त्याचा आढावा घेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.