लोकसत्ता टीम
नागपूर : महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचे वातावरण तयार झाले असून एकंदरीतच राज्यातून १० ते ११ ऑक्टोबरदरम्यान मान्सूस परतण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज दिवसभरात पालघर, ठाणे, रायगड तसेच मध्य महाराष्ट्राच्या पुणे, सातारा, सांगली, जळगाव, धुळे, नंदूरबार, नाशिक तसेच विदर्भ व मराठवाड्यात पावसाची शक्यता नाही. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात या भागातून मान्सून परतण्याची चिन्हे आहेत. मात्र, दक्षिण कोकणच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यात पुढील तीन दिवस आद्रर्ता तयार होऊन पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे या भागातून पुढील पाच ते सहा दिवसात मान्सून परतेल.
मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला असून येत्या दोन-तीन दिवसात राज्याचा दक्षिण मध्य भाग वगळता अन्य भागातूनही मान्सून परतेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र व दक्षिण कोकणातून मान्सून येत्या १० ऑक्टोबरपासून परतण्याची शक्यता आहे. मान्सून परतीचा प्रवास राजस्थानमधून साधारण १७ सप्टेंबरदरम्यान सुरु होत असतो. यावर्षी आठवडाभर उशिरा तो सुरू झाला आहे.
आणखी वाचा-गोंदिया : आदिशक्तीच्या मूर्तीलाही महागाईची झळ, श्रृंगार साहित्यांच्या दरात वाढ
आतापर्यंत संपूर्ण राजस्थान, हरियाणा, पंजाब तसेच जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश्, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छ भागातून मान्सून परतला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात हा प्रवास आणखी वेगात होईल. मान्सूनच्या परतीची रेषा सध्या गुरुग्राम, धर्मशाला, इंदौर, बडोदा व पोरबंदर अशी तयार झाली आहे. देशातील विविध राज्यांमधून पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरीही परतीच्या वाटेवर निघालेला हा मोसमी पाहुणा जाताजातासुद्धा धुमाकूळ घालणार आहे. सध्या देशाच्या अनेक भागांमध्ये पावसाच्या या बदलत्या हवामानाची चिन्हं पाहायला मिळत आहेत.