यवतमाळ : महागाव तालुक्यातील धारकान्हा या दुर्गम गावात वेणी अधर पुस प्रकल्पाच्या ‘बॅक वॉटर’मध्ये ५०च्या वर पाळीव जनावरांना जलसमाधी मिळाली. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आज, बुधवारी दुपारपर्यंत ३१ गायी, सहा वासरे आणि तीन वळूंचे मृतदेह धरणाच्या काठावर आढळून आले. आणखी १० ते १५ जनावरे बेपत्ता आहेत.

धारकान्हा गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या गायी आणि वासरे चरण्यासाठी वेणी अधर पुस प्रकल्पाच्या ‘कॅचमेंट’ क्षेत्रातील गवताळ भागात येतात. मंगळवारी या परिसरात गावातील किमान सव्वाशेच्या वर गायी, वासरे आणि तीन वळू चरण्यासाठी आले होते. एक गुराखी या पशुंसोबत होता. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी ही जनावरे धरणाच्या ‘कॅचमेंट’ क्षेत्रात पाण्याने वेढलेल्या बेटसदृश जागेत चरत होती.

प्रचंड वेगात घोंगावणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धरणाच्या ‘बॅक वॉटर’मध्ये मोठमोठ्या लाटा उसळल्या. यात पाण्याबाहेर येण्याचा प्रयत्न करणाऱ्या गायी, वासरे आणि वळू बुडून मृत्यूमुखी पडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या वादळात धरणाच्या पाण्यात वीज कोसळल्याने पाळीव पशू ठार झाल्याची शक्यताही व्यक्त होत असून मृत जनावरांच्या शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नमके कारण स्पष्ट होणार आहे.

अनेक जनावरांचे मृतदेह गाळात फसलेले आहेत. मृत पशूंना पाण्याबाहेर काढण्यासाठी बोटींचा वापर केला जात आहे. धारकान्हा हे गाव दुर्गम असून डोंगरगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येते. माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव देशमुख यांनी या घटनेची सूचना सकाळीच पोलीस आणि महसूल प्रशासनाला दिली. त्यानंतर तहसीलदार अभय मस्के तातडीने घटनास्थळी पोहचले. महागाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमित कुमार झा, मुडाणा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.पवन शिंदे, पशु उपचारक सतीश जाधव घटनास्थळी पोहचले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्राम महसूल अधिकारी एस.डी.खोसे, ग्रामसेवक संजय देशमुख, तालुका कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक घटनास्थळी पोहोचले. या दुर्घटनेनंतर उमरखेडचे आमदार किसन वानखडे यांच्यासह उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, तहसीलदार अभय मस्के घटनास्थळी भेट देवून पशुपालकांचे सांत्वन केले. नुकसानग्रस्त जनावरांचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी महसूल व पशुवैद्यकीय विभागाला दिले आहेत. तसेच पशुधन विमा व अन्य शासकीय योजनांमधून शक्य त्या सर्व स्वरूपात मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी आमदारांसह अधिकाऱ्यांनी बोटीतून ‘बॅकवॉटर’ परिसराची पाहणी केली. जनावरांचे मृतदेह बघून पशुपालकांनी घटनास्थळी आक्रोश केला होता.