नागपूर : वडील सहा वर्षांपासून कारागृहात आहे. ते आजारी असतात, त्यांना भेटण्याची इच्छा होती. ते मला बघून खूप रडले. कारागृहात असलेल्या एका बंदीवानाच्या मुलाने बाहेर आल्यावर दिलेली ही प्रतिक्रिया. मध्यवर्ती कारागृहातील दोनशेपेक्षा अधिक बंदीवानांनी शुक्रवारी सकाळी आपल्या मुलांची गळाभेट घेतली. यावेळी बंदीवान व त्यांच्या मुलांना अश्रू आवरता आले नाही.
बंदीवानाच्या पाल्यांसाठी मध्यवर्ती कारागृहात गळाभेटीचा कार्यक्रम झाला. बंदीवान कुणाचे भाऊ तर कुणाचे पती आहेत. गळाभेटीच्या निमित्ताने बंदीवानांची लहान मुले व त्यांचे कुटुंब सकाळपासूनच कारागृह परिसरात जमा झाले. पित्याला भेटायला आलेल्या मुलांच्या निरागस चेहऱ्यावर थोडी भीती, आनंद, कुतूहल असे संमिश्र भाव दिसत होते. सोळा वर्षांच्या आतील मुलांना पोलीस कारागृहाच्या आतमध्ये घेऊन जात होते. अनेक बंदीवानांनी आपल्या मुलांना बघून अश्रूंना वाट मोकळी करून दिली, तर काहींनी मुलांशी संवाद साधला.
हेही वाचा – नागपूर: भर पावसाळ्यात प्रथमच भारनियमन, तब्बल ९०० मेगावॅट…
मुलांनी वडिलांसाठी खाद्य पदार्थ आणले होते. ते त्यांनी वडिलांना खाऊ घातले. त्यांच्यामध्ये सुरू असलेला हळूवार संवाद ऐकू येत नसला तरी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, दु:ख, हास्यावरून अंदाज करता येत होता. मध्यवर्ती कारागृहातील परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कडेवर लहान मुले दिसत होती आणि प्रवेशद्वाराच्या बाहेरून त्याला त्यांचे वडील आतमध्ये असल्याचे दाखवत होते. कारागृहाचे अधीक्षक बंदीवानांना पाल्यांची भेट झाली का असे आस्थेपूर्वक विचारपूस करीत होते. यावेळी कारागृह अधीक्षक वैभव आगे, उपअधीक्षक दीपा आगे, तुरुंग अधिकारी पी. एन राऊत, दयानंद सोरटे, नरेंद्रकुमार अहिरे, वसीम इनामदार आदी कारागृहातील कर्मचारी उपस्थित होते.
