scorecardresearch

प्रियकर, ओळखीचे, नातेवाईकांकडूनच महिलांवर सर्वाधिक अत्याचार

उपराजधानीत पाच वर्षात ९९७ महिलांवर बलात्कार

raped in nagpur state
प्रतिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता

अनिल कांबळे

नागपूर : गेल्या काही वर्षांपासून राज्यात अल्पवयीन मुली, तरुणी, महिलांवरील बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. मुंबईनंतर हे प्रमाण उपराजधानीत सर्वाधिक असून गेल्या पाच वर्षांत नागपुरातील ९९७ महिलांवर बलात्काराच्या घटना घडल्या असून सर्वाधिक बलात्कार प्रियकर, ओळखीचे व्यक्ती आणि नातेवाईकांकडूनच झाल्याचे राज्य पोलिसांच्या अहवालातून समोर आले आहे.

अनेकदा नातेवाईक, ओळखीचे व्यक्ती किंवा प्रियकराकडून लैंगिक अत्याचार केला जातो. त्यामुळे घडलेल्या गुन्ह्यांपैकी केवळ ४० ते ५० टक्के गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यात केली जाते. अन्यथा अनेक तरुणी, महिला बलात्कार किंवा विनयभंगासारख्या घटना सहन करतात.

हेही वाचा >>> नागपूर : ‘तुला उद्या गूड न्यूज मिळेल…’ असा संदेश पतीला पाठवून चिमुकलीसह आईची तलावात उडी

विवाहित महिलांना सासरचे दीर, भासरा, सासरा, भाऊजी अशा नातेवाईकांकडून या प्रकारांना सामोरे जावे लागले आहे. काही प्रकरणात वस्तीतील ओळखीचे व्यक्ती किंवा मित्रांनी लग्न करण्याचे आमिष दाखवून बलात्कार केला आहे. अनेक दिवस लैंगिक शोषण केल्यानंतर लग्नास नकार देत समाजात बदनामी करण्यात आल्याचेही समोर आले आहे.

हेही वाचा >>> रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे : हावडा मार्गावर ८० तासांचा ‘मेगा ब्लॉक’

परिमंडळ पाचमध्ये सर्वाधिक घटना

नागपूर पोलिसांच्या परिमंडळ पाचमध्ये सर्वाधिक ८२ बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. कळमना, जरीपटका, कोराडी, पारडी, यशोधरानगर, कामठी आणि कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणी-महिलांवर लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये लग्नाचे आमिष दाखवून २६, प्रियकराकडून २९ आणि ओळखीच्या नातेवाईकांकडून २६ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत.

अल्पवयीन मुली, तरुणी आणि विवाहित महिलांवरील लैंगिक अत्याचार घटनांचा पोलिसांनी जलद तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करायला हवे. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायला हवी. बलात्काराच्या आरोपींवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनीही सकारात्मकता दाखवावी. मुली आणि महिलांनीही अत्याचार सहन न करता हिंमत करून पोलिसांची मदत घेऊन अशा आरोपींना धडा शिकवावा.

– आभा पांडे, सदस्य, राज्य महिला आयोग.

वर्षनिहाय आकडेवारी

वर्ष – बलात्कार – विनयभंग

२०१८ – १५८ – ३७६

२०१९ – १८३ – ३३९

२०२० – १७२ – ३२३

२०२१ – २३४ – ३५६

२०२२ – २५० – ३४०

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 09:28 IST