आरटीओ कार्यालयातील कामकाज होणार प्रभावित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात मुख्यमंत्र्यांसह महत्त्वाचे मंत्रीपद विदर्भाच्या वाटय़ाला असतानाही परिवहन खात्याकडून विदर्भाला डावलले जात आहे. या विभागाने मोटार वाहन निरीक्षण संवर्गातील १४३ जणांच्या बदल्या केल्या. त्यात विदर्भातून १० अधिकाऱ्यांना इतरत्र पाठवले असताना त्या बदल्यास केवळ पाच अधिकारी दिले आहे. त्यामुळे विदर्भातील आरटीओ कार्यालयातील कामकाज प्रभावित होऊन सामान्य नागरिकांनाच त्रास होणार आहे.

विदर्भात सिंचनासह सगळ्याच बाबींचा अनुशेष गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. सातत्याने विदर्भाला हव्या त्या प्रमाणात शासनाकडून निधी मिळाला नसल्याने वेळोवेळी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी विविध राजकीय पक्षांसह संघटनांकडून पुढे येते. या मुद्यावर भाजपने विधानसभेची निवडणूक लढवली. त्यामुळे नागरिकांनी त्यांना भरभरून मते दिली. सत्तापरिवर्तनानंतर नागपूरकर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली तर वित्त मंत्री, ऊर्जामंत्री, सामाजिक न्यायमंत्रीसह अनेक महत्त्वाची खाती विदर्भाच्या वाटय़ाला आली. त्यामुळे येथे सर्वाधिक विकासाची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत होते, परंतु परिवहन विभागाकडून येथील रिक्त पदे भरणे सोडा, बदली केलेल्या मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्यात कमी अधिकारी दिले जात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

शासनाने २ एप्रिलला राज्यातील १४३ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या केल्या. त्यात विदर्भातील विविध प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील १० मोटार वाहन निरीक्षकांना बदलीनंतर राज्याच्या इतर भागातील कार्यालयात पदस्थापना देण्यात आली, परंतु या बदल्यामुळे रिक्त होणाऱ्या जागांवर केवळ पाच जण देण्यात आले. त्यामुळे आधीच राज्यातील इतर भागाच्या तुलनेत सर्वाधिक रिक्त असलेल्या विदर्भातील प्रादेशिक परिवहन विभागातील कार्यालयात रिक्त पदांचा टक्का वाढणार आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्य़ातून तीन मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. मात्र त्यांच्या बदल्यात एकही नेमणूक करण्यात आली नसल्याने सर्वाधिक फटका येथील नागरिकांना चांगल्या सेवा मिळण्याबाबत बसण्याची शक्यता आहे. नक्षलग्रस्त गडचिरोलीतीलही तीन जणांच्या बदल्या झाल्यावर तेथे एकही निरीक्षक देण्यात आला नाही.

स्कूलबस तपासणीला फटका बसणार

उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार प्रत्येक आरटीओ कार्यालयाला शाळांना उन्हाळ्याची सुट्टी असताना मे-जून या महिन्यात स्कूलबस, स्कूलव्हॅनची तपासणी करून त्यांना योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) देणे आवश्यक आहे, परंतु विदर्भात सर्वत्र मोटार वाहन निरीक्षकांची संख्या कमी असल्याने या संवर्गातील सर्व वाहने तपासणी शक्य नसल्याचे या खात्याचे जाणकार सांगत आहेत. त्यातच केवळ ही कामे केल्यास प्रत्येक दोन वर्षांनी तपासायची व्यावसायिक संवर्गातील नवी वाहने व प्रत्येक वर्षी तपासायची, जुन्या वाहनांचे काम रखडण्याची शक्यता आहे.

मोटार वाहन निरीक्षकाची कामे

  • भरारी पथकाच्या माध्यमातून अवैध वाहनांवर कारवाई करणे
  • सगळ्याच प्रकारचे वाहन चालवण्याचे परवाने देणे
  • वाहनांच्या नोंदणीची कामे करणे
  • रस्ता सुरक्षा संबंधित कामे करणे
  • व्यावसायिकसह घरगुती वाहनांना परवाने देणे
  • वाहन योग्यतेच्या तपासणीसह विविध कामे

‘‘विदर्भातील काही आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांची संख्या बदल्यांमुळे कमी होणार आहे, परंतु पुढच्या आदेशात मोटार वाहन निरीक्षक मिळण्याची आशा आहे. परिवहन मंत्री विदर्भातील नागरिकांना चांगल्या सेवा देण्याकरिता कटिबद्ध आहेत. त्यामुळे पदोन्नतीतूनही काही अधिकारी विदर्भातील मिळतील.

शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर)

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motor vehicle inspector transfer issue rto
First published on: 06-04-2018 at 02:17 IST