नागपूर : देशाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर आज सर्वोच्च न्यायालयात बूट फेकण्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील राकेश किशोर नावाच्या वकिलाने हे धक्कादायक कृत्य केले होते. यावर सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावेळी खासदार आणि आझाद समाज पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी गंभीर प्रतिक्रिया दिली आहे.
आझाद समाज पक्षाच्या वतीने सुरेश भट सभागृहात प्रबुद्ध जन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आझाद म्हणाले की, पहिल्यांदा एक बौद्ध व्यक्ती या देशाचे सरन्यायाधीश झाले. मात्र, त्यांच्यावर फेकण्यात आलेला जुता हा केवळ त्यांच्यावर नाही तर आपल्यासारख्या प्रत्येकाच्या अंगावर फेकण्यात आला होता. सरन्यायाधीश गवई हे बुद्ध विचारांचे असल्यामुळे त्यांनी आरोपीला क्षमा केली. मात्र, पोलिसांनी अशा आरोपीला सोडायला नको होते. त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करायला हवी होती, असेही आझाद म्हणाले.
संघ आणि भाजप सत्तेत असूनही त्यांचा विचाराचा प्रचार करण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र, आपल्या समाजाची स्थिती बिकट असतानाही आमचा समाज थंड बसला आहे. आपल्यासाठी लढणारे दुसरे बाबासाहेब आता होणे कधीच शक्य नाही. महाराष्ट्र ही क्रांतीची भूमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरातून संघर्षाची मशाल पेटणे आवश्यक आहे. आपली राजकीय शक्ती दाखवून महाराष्ट्रात सत्ता निर्माण केल्याशिवाय स्वस्त बसू नका, असे आवाहन खासदार आणि आझाद समाज पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केले.
आझाद म्हणाले, उत्तर प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत आपल्या लोकांची समस्या आजही एकच आहे. त्यामुळे आपली राजकीय शक्ती उभी करून सत्ताधारी जमात निर्माण केल्याशिवाय आपल्या लोकांच्या घरात आनंदाचे दिवस येऊ शकत नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी सत्ताधारी जमात उभे करण्याचे सांगितलेले स्वप्न सत्यात उतरवूया, असे आवाहनही आझाद यांनी केले. आमचे लोक जयंती, शौर्य दिवसाला उत्सव साजरा करतात. यात गैर नाही. यातून एका दिवसा आनंद मिळेल मात्र, यामुळे आपल्या समाजाच्या समस्या सूटणार नाही.
आपल्याला आपली राजकीय शक्ती देशाला दाखवून देण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी कुणाला सत्तेत बसवायचे आणि खुर्चीवरून खाली खेचायचे ही शक्ती दिली. मात्र, आज आपल्या समाजात सामाजिक आणि सास्कृतिक जागृती असतानाही राजकीय शक्ती उभी करण्यात आपण कमी पडत आहोत. फुले, शाहू, आंबेडकरांना आपण परत आणू शकणार नाही. मात्र, त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चालून आपल्याला राजकीय शक्ती उभी करावी लागेल. बाबासाहेबांचे चार मुले वारली. आम्ही आपला एक मुलगा समाजाच्या आंदोलनासाठी देऊ शकणार नाही का?, असे आवाहनही आझाद यांनी केले.