लोकसत्ता टीम
भंडारा : नबाब मलिक यांनी दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमिनीचा सौदा केला होता. यावरून भाजपने त्यांना टार्गेट केले आहे. मात्र, जमिनीचा सौदा करणाऱ्या पेक्षा त्याचा पार्टनर असणे हा अधिक मोठा गुन्हा आहे. इकबाल र्मिचीसोबत खासदार प्रफुल पटेल यांची पार्टनरशिप असल्याने नवाब मलिकपेक्षा प्रफुल पटेल यांचा गुन्हा मोठा आहे, असे खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे भंडारा जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी आज पत्रकार परिषदेत खा. पटेलांबद्द्दल केले.
आणखी वाचा-बुलढाणा : खामगाव जालना महामार्गावर रास्ता रोको, पडळकरांवरील चप्पलफेकचे पडसाद
रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप दि. १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर येथे होणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी अतकरी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, भाजपची निती वेगळी आहे. नवाब मलिक आणि खा. प्रफुल पटेल यांच्या बाबत ‘ आपलं ते सोन आणि दुसऱ्याचे ते कारट असे धोरण आहे. ते नवाब मलिक यांच्यबाबत जाणीवपूर्वक द्वेष पसरवीत आहेत. किरण अतकरी पुढे म्हणाले, २ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. या फुटीला भंडारा हे मुख्य केंद्र असल्याने आ. रोहित पवार यांचे संपूर्ण लक्ष भंडारा लोकसभा क्षेत्रावर केंद्रीत आहे. त्यांनी युवकांना संदेश देण्यासाठी पुणे येथून युवा संघर्ष यात्रा सुरु केली आहे. या यात्रेचा समारोप नागपूर येथे दि.१२ डिसेंबर रोजी होणार आहे.
येणारी लोकसभा निवडणूक काँग्रेससोबत मिळून लढणार असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जो उमेदवार देतील तोच आमचा उमेदवार राहणार असल्याचे अतकरी म्हणाले.