प्रशांत देशमुख, लोकसत्ता

वर्धा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट खासदारांनाच काय काही मंत्र्यांना देखील मिळणे दुरापास्तच,अशी चर्चा ऐकायला मिळत असते. म्हणून खासदार रामदास तडस यांना त्यांच्याशी दोन,तीन नव्हे तर सात मिनिटे बोलण्याची मिळालेली संधी ते स्वतः आश्चर्यकारक मानतात.

अधिवेशनादरम्यान पाठपुरावा करीत खा तडस यांनी भेटीची वेळ मागितली होती.ती शुक्रवारी मोदींच्या कक्षात झाली.यावेळी त्यांना ‘ खेलो इंडिया ‘ उपक्रमा अंतर्गत आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाची माहीत तडस यांनी दिली.त्यावेळी मोदी यांनी ग्रामीण भागातील मुलं मुली यात सहभागी झाले होते का,अशी विचारणा केली.खेळामुळे मुलांमध्ये ऊर्जा निर्माण होते,अशी टिपणी त्यांनी केल्याचे तडस यांनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले.

आणखी वाचा- बुलढाणा: संपकरी म्हणतात ‘झुकेगा नही…’, सोमवारपासून थाळीनाद, आक्रोश व सहपरिवार मोर्चा

याच अनुषंगाने तडस यांनी पंतप्रधान घरकुल योजनेत शहरी गरजूंना अडीच लाख रुपये मिळतात.मात्र ग्रामीण भागात एक लाख साठ हजार रुपयेच दिल्या जातात.बांधकाम व मजुरी खर्च सारखाच असतांना असा भेद योग्य नसल्याचे निदर्शनास आणले.तसेच वर्धेत एक भव्य स्टेडियम देण्याची मागणी केल्याचे तडस म्हणाले.सेवाग्राम विकास आराखड्यात झालेली विकासकामे पाहण्यास येण्याचे निमंत्रण दिल्यावर नक्की विचार करू,असे उत्तर पंतप्रधान मोदी यांनी आपणास दिल्याचे तडस यांनी सांगितले.ग्रामीण भागातील समस्यांबाबत त्यांची विशेष आस्था दिसून आल्याचे तडस म्हणाले.