नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि निकालामध्ये होणारा विलंब हा कायम चर्चेचा विषय असतो. परंतु, यावेळी परीक्षेच्या गोपनीयतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता प्रचंड वाढली होती. ही चूक थेट आयोगाकडून झालेली नसली तरी एका छोट्या परीक्षेमध्ये हा प्रकार घडल्याने पारदर्शकतेचा विषयही समोर आला आहे.
दोन वर्षांपूर्वी एमपीएससीकडून माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्या विविध पदांसाठी जाहिरात काढण्यात आली होती. यासाठी राज्यभरातील विविध उमेदवारांनी अर्ज केले. या जाहिरातीचे दोनदा शुद्धीपत्रकही काढण्यात आले होते. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही परीक्षा १० मे रोजी मुंबई येथील केंद्रावर घेण्यात आली. परंतु, ही परीक्षा होण्यापूर्वीच मोठा गोंधळ उडाला होता. या परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाने आधीच जाहीर केला आहे. त्या आधारे आयोगाला ऑनलाईन परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करायची होती.
ही प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी एमपीएससीने मुंबई विद्यापीठाला पत्र पाठवले. या पत्रामध्ये त्यांनी प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी तज्ज्ञ द्यावेत अशी मागणी केली होती. हे पत्र मुंबई विद्यापीठाने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले. सोबतच विद्यापीठाने स्वतःचे पत्रही यासोबत संकेतस्थळावर दिले. यामुळे प्रश्नपत्रिका कुठून तयार केली जाणार आहे, ते कोण तयार करणार आहेत, ही माहिती उघड झाल्याचे वृत्त लोकसत्ता ऑनलाईनने दिले होते. त्यानंतर आता एमपीएससीने स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये त्यांनी प्रश्नपत्रिका कशी तयार केली जाते याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
काय घडले होते ?
महाराष्ट्र लोकसेवा आयोग या सांविधानिक संस्थेमार्फत महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील असलेल्या विभागांच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाते. काही परीक्षांच्या अभ्यासक्रमामध्ये वृत्तपत्रविद्या, जनसंपर्क, जनसंज्ञापन विषयक घटक या विषयाचा समाविष्ट आहे. संबंधित विषयावर आधारित वस्तुनिष्ठ स्वरुपाचे प्रश्नसंच तयार करण्यासाठी तसेच प्रश्नसंच तयार केल्यानंतर चिकित्सण परीक्षण करण्याकरिता सचोटी व कळकळीने काम करणाऱ्या त्याचबरोबर संबंधित विषयाचे विशेष ज्ञान व नैपुण्य तसेच मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आहे व ज्यांच्या विरुद्ध कोणतीही शिस्तभंग विषयक कार्यवाही सुरु नाही अशा अनुभवी अध्यापकांची तज्ज्ञ म्हणून परीक्षक सूची तयार करावयाची आहे.
सदर पदाच्या अभ्यासक्रमाची प्रत ” सोबत जोडली आहे. सदर अभ्यासक्रमामधीर नमूद घटक विचारात घेऊन, आपल्या विद्यापीठातील संबंधित विषय /घटकाचे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक अशा सर्व अध्यापकांच्या नावांची यादी, त्यांची संपूर्ण नावे, पदनाम, विभागाचे नाव, पदावरील कार्यकाल, निवासाचा पत्ता, कार्यालयाचा व घरचा दूरध्वनी क्रमांक / मोबाईल क्रमांक इत्यादी तपशीलासह कृपया आयोगास पाठवावी, अशी विनंती करण्यात आली आहे. असे पत्र मुंबई विद्यापीठाला पटीवले होते. यावरून वाद निर्माण झाला होता.
आयोगाचे स्पष्टीकरण काय आहे?
आयोगाच्या स्पष्टीकरणानुसार, आयोगाकडून विविध संवर्गाच्या पदभरतीकरिता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांचे अभ्यासक्रम हे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातात. तसेच त्याअनुषंगाने विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची माहिती ही देशभरातील विविध संस्थांकडून प्राप्त करून घेण्याच्या हेतूने आयोगाकडून पत्रव्यवहार करण्यात येत असतो. ई-बातमीमध्ये नमूद केल्याप्रमाणे शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नियंत्रणाखालील उपरोक्त नमूद संवर्गाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका ठराविक विद्यापीठातील तज्ज्ञांमार्फतच तयार केली जाते असे स्पष्ट केले आहे.