नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २५ ऑगस्टला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा रद्द करण्याला पंधरा दिवस उलटल्यानंतरही परीक्षेची तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थी आता आक्रमक झाले आहेत. तारखे अभावी विद्यार्थ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडल्याने काहींनी आयोगाच्या अशा दिरंगाई विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला, तर सोमवारी ‘टि्वटर’ माेहीम राबवत आयोगाने तारीख जाहीर करावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात आयोगातील अधिकाऱ्यांची महत्त्वाची माहिती दिली असून परीक्षेची तारीख कधी जाहीर होणार यासंदर्भात सांगितले आहे.

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ‘टि्वटर’ माेहीम

 २२ ऑगस्टला परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षेचे नियोजन कोलमडले असून ते नैराश्यात गेले आहेत. सोमवारी ‘टि्वटर’ माेहिमेच्या माध्यमातून परीक्षेची तारीख जाहीर करण्यासाठी उमेदवारांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच काहींनी वारंवार परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याने आयोगाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे.

हेही वाचा >>>Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विदर्भात धुसफूस, ‘हे’ आहे कारण

 महिन्याचा १२ हजारांचा खर्च करायचा कसा ?

डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध होऊन नऊ महिन्यानंतरही आयोगाला परीक्षा घेणे शक्य झाले नाही. विविध कारणांमुळे तब्बल चार वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आली. राज्यसेवा परीक्षार्थींची संख्या अडीच लाखांहून अधिक आहे. यातील बहुतांश विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील आहेत. हे विद्यार्थी पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सोलापूर आदी शहरामध्ये राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. येथे राहणे, जेवण, अभ्यासिका व इतर खर्च मिळून सरासरी ८ ते १२ हजार रुपये प्रति महिना  खर्च होतो. कित्येक विद्यार्थ्यांना हा खर्च पेलवत नाही. परीक्षेचे आयोजन वरचेवर लांबत गेल्यामुळे याचा सर्वात मोठा आर्थिक फटका सहन  करावा लागतो. तसेच वाढत्या वयानुसार उपजिविकेचे प्रश्न व लग्नाचा प्रश्न अनुत्तरीत राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड सामाजिक, कौटुंबिक व मानसिक दबावाला सामोरे जावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>नागपुरात भिकारी गोळा केले… आलिशान गाडीत बसवले आणि थेट…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एमपीएससी’चे अधिकारी म्हणतात काळजी…

आयोगाच्या दिरंगाई धोरणामुळे करोना काळापेक्षा भीषण परिस्थिती झाली आहे. चहूबाजूंनी विद्यार्थी वर्ग चक्रव्यूहात सापडला आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होणार असल्याने सदर परीक्षा डिसेंबरमध्ये होण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे. यामुळे आचारसंहितेपूर्वी परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. यासंदर्भात ‘एमपीएससी’च्या सचिवांना विचारणा केली असता त्यांनी तुर्तास काहीही सांगण्यास नकार दिला. मात्र, परीक्षेची तारीख ठरवणे हा आयोगाचा निर्णय असून बैठकीमध्ये तारीख ठरताच विद्यार्थ्यांना कळवण्यात येईल असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी काळजी करू नये असे आवाहन केले.