बीड : भाजपा नेते, दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे आणि अशोक सामत यांची मैत्री ज्या संस्थेतून विस्तारत गेली त्या वैद्यनाथ अर्बन बँकेच्या माध्यमातून दोन्ही घराण्यांतील पुढची पिढीही ऋणानुबंध जपत असल्याचे पाहायला मिळाले. नुकत्याच पार पडलेल्या वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीनंतर संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी विनोद अशोक सामत यांची फेरनिवड करून राज्यातील पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंडे-सामत घराण्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचा वारसा कायम असल्याचा संदेश दिला आहे.
वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनेलचे सर्व संचालक निवडून आले. त्यातील चार उमेदवार बिनविरोध तर १३ सदस्य बहुताने निवडून आले. यातील तीन संचालक हे धनंजय मुंडे समर्थक आहेत.
बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे लक्ष लागले होते. अध्यक्षपदाची निवड परळीतील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी समृद्ध जाधव यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पार पडली. या बैठकीत विनोद सामत यांची अध्यक्ष म्हणून तर रमेश कराड यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
पंकजा मुंडे यांचे वर्चस्व असलेल्या आणि माजी खासदार डाॅ. प्रीतम मुंडे सदस्य-संचालक असलेल्या वैद्यनाथ बँकेच्या अध्यक्षपदी विनोद सामत यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. यामागे मुंडे आणि सामत घराण्याचे असलेले मैत्रीपूर्ण नाते हे प्रमुख कारण असल्याचे दिसून येते.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि अशोक सामत यांची मैत्री परळीच्या राजकारणात कायम चर्चेत राहिली आहे. मुंडेंचे परळीतील राजकारण अशोक सामत यांच्या मैत्रीतूनच आकारास येत राहिले. मुंडे यांनी सामत यांना भाजपचा पहिला नगराध्यक्ष करून परळी नगरपालिकेवर कमळ फुलवले होते. पुढे मुंडे राज्यात उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्रिपदावर असताना अशोक सामत यांची महावितरणच्या संचालक मंडळावरही वर्णी लावली होती. त्याचबरोबर अशोक सामत हे दोन वेळा वैद्यनाथ बँकेचे अध्यक्षही राहिलेले होते. आता अशोक सामत यांचा मुलगा विनोद सामत यांची बँकेच्या अध्यक्षपदावर निवड झाली असून, विनोद हे यापूर्वी दहा वर्षे बँकेचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत.
विश्वासातून मैत्रीपूर्ण संबंध
गोपीनाथ मुंडे व अशोक सामत यांच्यातील विश्वासाचे मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत. पुढच्या पिढीतही विश्वास जपण्यालाच प्राधान्य आहे. या विश्वासातून राज्यातील मंत्री पंकजा मुंडे यांनी बँकेच्या अध्यक्षपदावर निवड केली. त्यांचा विश्वास सार्थ ठरवला जाईल.विनोद अशोक सामत, नवनिर्वाचित अध्यक्ष, वैद्यनाथ बँक.