बुलढाणा : राज्यातील नगर परिषदेच्या निवडणुकांचे भिजतघोंगडं दोन तीन वर्षांपासून प्रलंबित होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर याला गती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत या निवडणूका घेण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आज, सोमवारी कोजागरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर नगरपालिका अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. आरक्षणामुळे महिलांचेच तोंड गोड झाले! इच्छुक पुरुष उमेदवारांचा अपेक्षाभंग झाला आहे. काही ठिकाणी गुडघ्याला बाशिंग बांधून नगराध्यक्षपदाचे दावे सांगणाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील ११ नगर परिषद व नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाली आहे. येणाऱ्या कालावधीत जिल्ह्यातील ११ नगर परिषदेच्या निवडणूका होणार आहे. बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठीचे आरक्षण खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आहे. खामगाव नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी, त्याचप्रमाणे नांदुरा आणि लोणार मध्ये ही खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. देऊळगाव राजा नगर परिषदेसाठी अनुसूचित जाती मधील महिलांसाठी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आहे. मलकापूर मध्ये ओबीसी प्रवर्गातील महिलांना आरक्षणामुळे संधी मिळणार आहे. शेगाव आणि जळगाव जामोद नगराध्यक्ष पदासाठीचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी खुले आहे. शेगाव मधील अनुसूचित जातीच्या महिलांना संधी मिळाली आहे. सिंदखेडराजा, मेहकर आणि चिखली नगराध्यक्ष पदासाठीचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी आहे.
गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे नगराध्यक्ष पदासाठी बेरजेचे गणिते आखत होते. पण आज त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. यामुळे पालिका वर्तुळात ‘कही खुशी, काही गम’चे मजेदार वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे आता नेत्यांना नव्याने राजकीय व्युहरचना करावी लागणार असून लढतीची समीकरणे बदलावी लागणार आहे.