यवतमाळ : जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबायचे नाव घेत नसल्याने पोलीस प्रशासनही हतबल झाल्याचे चित्र आहे. शुक्रवारी जिल्ह्यात दोन खुनांच्या घटना उघडकीस आल्या. त्यात एका खुनाच्या घटनेत विधीसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याचे आढळल्याने चिंता व्यक्त होत आहे. यातील एक खून यवतमाळ शहरात तर एका महिलेचा खून आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे झाला.
यवतमाळ शहारातील नागपूर बायपासवर तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला चढवून खून केला. तर आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे विधवा महिला झोपेत असताना धारदार शस्त्राने वार करून संपविले. नागपूर मार्गावरील निर्जनस्थळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून संपविण्यात आले.
हेही वाचा – अमरावती: अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांना देणार रोपटे भेट; पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम
पोलिसांनी घटनेची तपासचक्रे वेगात फिरवून चार संशयित विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. रोशन उर्फ ज्ञानेश्वर मस्के (३०, रा. वाघापूर) असे मृताचे नाव आहे. रोशन गुरुवारी रात्री मित्रांसोबत एका हळदीच्या कार्यक्रमासाठी गेला हेाता. त्याचे मित्र आपापल्या घरी पोहोचले. मात्र, रोशन उशिरापर्यंत घरी आला नाही. नातेवाईकांनी सगळीकडे त्याचा शोध घेतला.
दरम्यान, शुक्रवारी नागपूर महामार्गावरील दाट झाडीत रोशनचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून विविध तपास पथके नेमले. काही वेळातच चार संशयित विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. रोशन याच्यावर लोहारा पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल होता. अवैध धंद्याच्या वर्चस्वातून खून झाल्याची चर्चा आहे.
दुसऱ्या घटनेत, आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे सुनीता दत्ता मुधळकर (५०, रा. बोरगाव), या विधवा महिलेचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. सुनीताच्या पतीचा २०१३ मध्ये मृत्यू झाला होता. त्यांनतर ती रोजमजुरी करून उदनिर्वाह करत होती. तिच्या दोन मुलींचा विवाह झाला असून मुलगा मुंबई येथे रोजमजुरीच्या कामासाठी गेला होता. त्यामुळे ही महिला गावी एकटीच राहत होती. गुरुवारी रात्री अज्ञात मारेकऱ्याने तिच्या घरात प्रवेश करून धारधार शस्त्राने तिच्यावर वार करून तिला ठार केले. ही घटना उजेडात आल्यानंतर गावात खळबळ उडाली. या प्रकरणी बाबाराव निबोळे यांच्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
महिलेचा खून कशासाठी करण्यात आला याबाबतच तर्क वितर्क लावले जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत खुनांचे सत्र सुरूच असून आतापर्यंत ४० खुनांच्या घटनांची नोंद झाली आहे. बहुतांश खून गुन्हेगारीतील वर्चस्व, कौटुंबिक वाद आणि अनैतिक संबंधांमधून झाले आहे.