अनिल कांबळे
नागपूर : महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून हत्याकांडाच्या घटनांतही सातत्याने वाढ होत आहे. राज्यात गेल्या वर्षभरात २ हजार ३३० हत्याकांडाच्या घटना घडल्या असून सर्वाधिक हत्याकांड अनैतिक संबंधातून घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनैतिक संबंधातून घडलेल्या हत्याकांड राज्यात पुणे शहर पहिल्या स्थानावर आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात गतवर्षी २ हजार ३३० खुनाच्या घटना घडल्या आहेत. हत्याकांड घडण्यास अनेक कारणे जबाबदार आहेत. त्यात जुने वैमनस्य, राजकीय द्वेष, युवक-युवतीमधील प्रेमसंबंध, विवाहित महिला व पुरुषांचे असलेले अनैतिक संबंध, दरोडा टाकताना केलेला विरोध, धार्मिक तेढ, कौटुंबिक वाद, संपत्तीच्या वादासह अन्य कारणांचा समावेश आहे. परंतु, राज्यात सर्वाधिक २३२ हत्याकांड विवाहितांच्या अनैतिक संबंधातून घडलेले आहे. पत्नीशी अन्य पुरुषांशी किंवा पतीचे अन्य विवाहितेशी असलेल्या अनैतिक संबंधातून सर्वाधिक हत्याकांड राज्यात घडले आहे. पत्नीचे प्रियकरासोबत असलेल्या प्रेमसंबंधाबाबत पतीला कुणकुण लागल्यामुळे चक्क खून केल्याच्या घटनांमध्येसुद्धा गेल्या वर्षांत वाढ झाल्याची नोंद आहे. देशात महाराष्ट्रानंतर आंध्रप्रदेशात १८६ हत्याकांड अनैतिक संबंधातून घडले असून तिसऱ्या क्रमांकावर मध्यप्रदेशचा (१६१) क्रमांक लागतो. त्यानंतर कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा राज्यात सर्वाधिक खून झाल्याची नोंद आहे.
अनैतिक संबंधातून घडलेले गुन्हे
राज्य – खून
महाराष्ट्र – २३२
आंध्रप्रदेश – १८६
मध्यप्रदेश – १६१
कर्नाटक – १५२
तामिळनाडू – १४०
पुण्यात सर्वाधिक..
विद्येचे माहेरघर आणि सुसंस्कृत शहर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. मात्र, अनैतिक हत्याकांड घडवण्यात पुणे पहिल्या क्रमांकावर आहे. पुण्यात अनैतिक संबंधातून सर्वाधिक १० हत्याकांड घडले आहेत, तर नागपुरात ७ हत्याकांडाला अनैतिक संबंधाची किनार आहे. मुंबईत मात्र केवळ ३ हत्याकांड अनैतिक संबंधातून घडल्याची नोंद आहे.
राज्यात प्रेमसंबंधातून ११९ हत्याकांड
अविवाहित युवक-युवतींच्या प्रेमसंबंधातून सर्वाधिक हत्याकांड उत्तरप्रदेशात (३३४) घडले आहेत. महाराष्ट्रात ११९ हत्याकांड घडले असून राज्याचा पाचवा क्रमांक लागतो. दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आणि बिहारचा क्रमांक लागतो. आईवडिलांना मुलीच्या प्रियकराचा किंवा प्रियकराने प्रेयसीचा खून केल्याच्या सर्वाधिक घटना आहेत.