अमरावती : दोन सादरीकरणामध्ये अवकाश न घेता सलग गाण्‍यांचे सादरीकरण करून विक्रम नोंदविण्यासाठी अमरावतीत एक उपक्रम राबविण्यात आला. साडेपाच हजारांहून अधिक गाणी, कविता आणि दोन-तीन मिनिटांचे नृत्य, अशी मैफील सलग १८ दिवस अमरावती शहरातील अभियंता भवन येथे रंगली. या मैफिलीचा सुखद अनुभव संगीतप्रेमींना घेता आला.

अमरावतीमधील ४०१ तासांचा संगीत मैफिलीचा विक्रम नोंदविण्यात येणार असल्याचे दिल्लीचे वर्ल्ड रेकॉर्डचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पवन सोलंकी यांनी जाहीर केले. त्यानंतर अभियंता भवन सभागृहात कलावंतांनी जल्लोष केला.

हेही वाचा – हृदयरोगाचा धोका कमी करायचाय? मग, मांसाहार करणाऱ्यांनी…

शहरातील स्वराज्य एंटरटेनमेंट या हौशी गायकांच्या संस्थेमार्फत सलग गाण्यांचा विक्रम नोंदविण्यासाठी गेल्‍या ४ जानेवारीपासून अभियानाला प्रारंभ झाला. विविध ठिकाणचे हौशी गायक आणि कलावंत या विक्रमात आपला सहभाग नोंदविण्यासाठी समोर आले. सलग १८ दिवसांमध्ये अडीच ते तीन हजार हौशी गायकांनी या मैफिलीत आपल्या गाण्यांनी वातावरण संगीतयम केले. विशेष म्हणजे विविध क्षेत्रातील हौशी गायक या मैफिलीत सहभागी झाले. पोलीस खात्यातील अधिकारी, विविध सरकारी विभागातील कर्मचारी, महापालिकेतील उपायुक्त, शिक्षक, जिल्हा परिषदेतील अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अशा विविध विभागातील कर्मचारी यांनी सादरीकरण केले. आपल्या व्यवसायासोबत गाण्याची कला जोपासणारे कलावंत या संगीतमय सोहळ्यात सहभागी झाले.

विक्रम नोंदविण्याच्या उद्देशाने कलावंतांनी ४ जानेवारीला गाण्यांना सुरुवात केली. हा नॉनस्टॉप धमाल ४०१ तासांपर्यंत अगदी कायम राहिला. चित्रपटातील जुन्या नव्या गीतांसह गझल, भक्ती गीत, प्रेमगीत यासह सर्व प्रकारच्या गाण्यांचे सादरीकरण झाले. मैफिलीत हौशी कलावंताचा सहभाग असताना मंच रिकामा राहणार नाही, याची दखल कार्यक्रम सुरू झाल्यापासून घेण्यात आली.

हेही वाचा – नागपूर : प्रेमविवाहानंतर ४,९४७ पती-पत्नीच्या संसारात विघ्न; भरोसा सेलकडून नवविवाहित दाम्पत्यांचे….

हा विक्रम नोंदविण्यासाठी काही अटींचे पालन करण्यात आले. २४ तासांत केवळ वीस मिनीटच रंगमच रिकामा राहील, याची दक्षता आयोजकांकडून घेण्यात आली. एखादे गाणे सादर झाल्यावर दुसऱ्या गायकाला मंचावर येण्यासाठी वेळ लागणे, गाणे सेट होणे, या दरम्यान लागणारा अर्धा-एक मिनिटांचा कालावधी २४ तासातील वीस मिनिटांसाठी गणला जातो, अशी माहिती आयोजकांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यक्रमाच्‍या समारोप प्रसंगी आमदार सुलभा खोडके, मनीष पाटील, नानकराम नेभनानी, डॉ. गोविंद कासट, सचिन वानखडे, सुदर्शन जैन, पुरुषोत्‍तम मुंधडा, दिलीप लोखंडे, दिनकर तायडे, स्‍वामिनी तायडे आणि स्‍वराध्‍या एंटरटेनमेंटची चमू उपस्थित होती.