नागपूर : ‘‘शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मीच पक्षाला दिला होता. मी सरकारमध्ये नसेन, असेही ठरले होते. मात्र, केंद्रीय नेतृत्वाने आग्रह धरल्याने सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला’’, असे भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे मंगळवारी सांगितले. पत्रकार क्लबच्या ‘वार्तालाप’ कार्यक्रमात ते बोलत होते.

‘‘राज्यात महाविकास आघाडी तयार झाली, तेव्हाच अशी अनैसर्गिक आघाडी फार काळ चालत नाही, हे मी स्पष्ट केले होते. आघाडीतील अंतर्विरोध आणि शिवसेना आमदारांमधील अस्वस्थता यातून या पक्षात उठाव झाला, आम्ही त्याला साथ दिली,’’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केल़े

‘‘शिवसेनेचाच मुख्यमंत्री करू, हा निर्णय आधीच घेतला होता. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्तावसुद्धा मीच पक्षाला दिला होता. मी सरकारमध्ये नसेन, असेही ठरले होते. मात्र, मी सरकारमध्ये सहभागी व्हावे, असा आग्रह केंद्रीय नेतृत्वाने धरला़ ज्या पक्षाने मला सर्वोच्च पदावर बसविले, त्या पक्षाचा आदेश माझ्यासाठी शीर्षस्थानी आहे,’’ असे फडणवीस म्हणाले. 

शिंदे यांच्यावर ‘रिक्षावाला’ म्हणून होणाऱ्या टीकेलाही फडणवीस यांनी उत्तर दिले. काँग्रेसने मोदीजींना ‘चायवाला’ म्हणून हिणवले, त्याच पंतप्रधानांनी काँग्रेसला पाणी पाजले आहे. त्यामुळे कुणी रिक्षावाले म्हणून हिणवत असेल तर त्याचा आनंदच आहे.  शिवसेनेचा कौटुंबिक वारसा उद्धव ठाकरे यांच्याकडे असला तरी बाळासाहेबांचा वैचारिक वारसा शिंदे पुढे नेत आहेत़  भविष्यात काय होईल आणि पक्षचिन्ह कोणाला मिळेल, याबद्दल काही सांगता येत नाही, असे फडणवीस म्हणाल़े

ओबीसी आरक्षणाबाबत लवकरात लवकर अहवाल प्राप्त करून तो सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही फडणवीस यांनी सांगितल़े  मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत भाष्य करणे त्यांनी टाळले.  त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला. 

पंतप्रधानांच्या हस्ते ‘समृद्धी’चे उद्घाटन 

नागपूर-मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरच केले जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. २०१४ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना या महामार्गाची घोषणा झाली होती़