नागपूर : उपराजधानीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) च्या कान-नाक-घसा रोग विभागात स्वतंत्र ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी कक्ष स्थापन करण्यात आले आहे. कक्षाचे उद्घाटन एम्सचे संचालक डॉ. एम. हनुमंथा राव आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या हस्ते झाले.

एम्समध्ये कान-नाक-घसा रोग विभागाकडून सातत्याने रुग्णसेवेचा विस्तार होत आहे. दोन ते अडीच वर्षांत येथील बाह्यरुग्ण विभाग आणि आंतररुग्ण विभागातील रुग्णसंख्या तिप्पटीहून जास्त वाढली. या विभागाकडून स्वतंत्र ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी कक्षही स्थापन केला गेला. त्याचे उद्घाटन झाल्याने आता येथे कर्णबधिर रुग्णांसह विविध कारणाने बोलण्यात अडचण येणाऱ्या रुग्णांना कर्मयंत्रासह सोप्या पद्धतीने बोलण्याचे कौशल्य येथे शिकवण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा : जन्मजात मेंदूत संक्रमण असलेल्या बाळाला जीवदान; मेडिकलच्या डॉक्टरांना यश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेंदूघात वा इतर रुग्णांमध्ये बोलण्याच्या अडचणी येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या रुग्णांसाठी येथे स्पीच थेरपी खूप महत्त्वाची ठरणार आहे. एम्सच्या कान- नाक-घसा रोग विभागात कर्णदोष असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून कर्णयंत्रही उपलब्ध केले जात आहे. एम्समध्ये सध्या प्युअर टोन ऑडिओमेट्री, बिहेवियरल ऑडिओमेट्री, व्हिज्युअल रिइन्फोर्समेंट ऑडिओमेट्री, इमिटन्स ऑडिओमेट्री, ब्रेन स्टेम इव्होक्ड रिस्पॉन्स ऑडिओमेट्री (बीईआरए), स्क्रीनिंग एबीआर, ओटो अकौस्टिक एमिशन (ओएई), व्हॉइस आणि स्पीच असेसमेंट आणि थेरपी विभाग यासारख्या विविध सेवा मिळू शकतील. लवकरच एम्समध्ये काॅक्लिअर इम्प्लांटही सुरू होणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट केले गेले.