नागपूर : कोतवालबड्डी गावालगत असलेल्या एशियन फायर वर्क्स दारुगोळा कंपनीत रविवारी दुपारी सलग तीन धमाके झाल्यामुळे दोन कामगार जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सोमवारी कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ मृतांचे आणि जखमींच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली. एरव्ही ५० ते ६० कामगारांनी गजबजलेल्या कंपनीच्या परिसरात आज स्मशान शांतता होती. या स्फोटात लक्ष्मण रजक आणि मुनीत मडावी या मृत्यू झाला तर सौरभ मुसळे, साहिल दिलावर शेख, घनशाम लोखंडे हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कळमेश्वर तालुक्यातील कोतवालबड्डी गावात गेल्या २०१७ ला एशियन फाय़र वर्क्स कंपनी सुरु झाली. या कंपनीत जवळपास ६० कामगार काम करीत होते. या कंपनीत बारुद आणि वातीची निर्मिती करण्यात येते. रविवारी १७ पुरुष आणि १६ महिला कामगार असे एकुण ३३ कामगार कंपनीत काम करीत होते. दुपारी दोन वाजता जेवणाची सुटी झाली आणि २८ महिला-पुरुष कामगार आपापले डबे घेऊन जे‌वण करायला कंपनीच्या बाहेर पडले. मात्र, ५ कामगार काम करीत होते. दरम्यान, सलग तीन स्फोट झाले. या स्फोटात लक्ष्मण रजक आणि मुनीत मडावी यांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. स्फोट होताच पोलीस अधिकारी अनिल म्हस्के हे ताफ्यासह घटनास्थळावर पोहचले. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकाही पोहचले. स्फोटाची तिव्रता एवढी मोठी होती की स्फोटाचा आवाज जवळपास १० किमीपर्यंत गेला आणि कंपनीला मोठी आग लागली होती. या घटनेमुळे कंपनीत खळबळ उडाली. मृतकांना मेडिकल रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले तर जखमींवर काटोल आणि कळमेश्वर येथे उपचार सुरु आहेत. दोन्ही मृतकांच्या कुटुंबियांना २० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी कामगारांनी केली आहे. सोमवारी सकाळी कामगारांसह मृतांचे नातेवाईक आणि जखमींचे कुटुंबियांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर एकच गर्दी केली. मात्र, कंपनीत स्मशान शांतता होती. पोलिसांचे पथक तपास करीत होते.

…अखेर गुन्हा दाखल

कोतवालबड्डीतील कंपनीत स्फोट झाल्याच्या घटनेनंतर कळमेश्वर पोलीस ठाण्यात तुर्तास अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. फॉरेंसिक पथक आणि पेसो पथकाने दिलेल्या अहवालानंतर दोषी असलल्या आरोपींचे नाव एफआयआरमध्ये टाकण्यात येईल. मात्र, स्फोटासाठी दोषींवर नक्कीच कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयपीएस अधिकारी अनिल म्हस्के यांनी दिली.

कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

एशियन फायर वर्क्स दारुगोळा कंपनीत गेल्या आठ महिन्यांपूर्वीसुद्धा एक स्फोट झाला होता. त्यात अनिल कुमार रजक हा जखमी झाला होता. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने त्याचा उपचार करुन प्रकरण दाबले. त्यानंतरही कंपनीने कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले. कामगारांना हेल्मेट, शूज, हातमोजे इत्यादी कोणतेही साहित्य कंपनीने पुरवले नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकऱ्यांचे नुकसान

कोतवालबड्डीतील एशियन फायर वर्क्स दारुगोळा कंपनीत झालेल्या सलग तीन स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली. बारुदचे पेटते गोळे बऱ्याच अंतरावर फेकल्या गेले. कंपनीच्या आजुबाजुला असलेल्या शेतातही पेटते गोळे पडले. त्यामुळे शेतातील शेतमालाने पेट घेतला. या आगीत शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.