बुलढाणा : लग्नच काय अगदी नानमुख चा कार्यक्रम म्हटले कि बँड-बाजा, डीजे, मद्यपान करून बेधुंद होऊन धांगडधिंगा करणे, असा आजचा विचित्र ‘ट्रेंड’ झालाय! केवळ शहरच नव्हे तर ग्रामीण भागातही हे चित्र पाहवयस मिळते. डीजे च्या या नावाखाली सोहळ्याला होणारा उशीर, होणारी पैश्याची उधळपट्टी, दारूचा वाहणारा पूर, कानथळ्या बसविणारा आवाज, ध्वनी प्रदूषण, यातून होणारे वाद, हाणामाऱ्या हे याचे पूरक परिणाम. एकंदरीत डीजे विना वैवाहिक कार्यक्रम हे कल्पनाच आजच्या पिढीला मान्यच नाही… मात्र खामगाव तालुक्यातील ढोरपगाव येथील राहुल मुंडे या खऱ्या अर्थाने सुशिक्षित युवकाने याला नाकारले.

भरकटलेली तरुणाई, समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्याने लग्नाच्या आदल्या दिवशी पार पडणाऱ्या नानमुख कार्यक्रमात डीजे समोर फुली मारली! त्याचा वापर न करता वारकरी दिंडी काढून आपला नानमुख सोहळा थाटात आणि पवित्र वातावरणात साजरा केला. कृषी पदवीधर असलेले ढोरपगाव येथील राहुल मुंडे यांचा विवाह सोहळा नुकतेच पार पडला. विवाहाच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच नानमुखाच्या दिवशी गावात नवरदेवाची डीजे लावून मिरवणूक काढले जाते. मात्र मुंडे यांनी या गोष्टीला फाटा देत डीजे ऐवजी गावात वारकरी दिंडी काढून नानमुख सोहळा साजरा केला.

नवरदेव राहुल, पिता गणेश मुंडे आणि मुंडे परिवाराने एक आदर्श मांडण्यासाठी मुलाच्या लग्नात अवाजवी खर्च न करता नानमुखाच्या दिवशी वारकरी संप्रदाय दिंडी काढण्याचे ठरविले.कृषी पदवीधर नवरदेव राहुल मुंढे यांनी पावल्या आणि फुगडी करून दिंडीमध्ये चांगला सहभाग घेतला.रात्री गावातून नवरदेवाची मिरवणूक काढण्यासाठी दिंडीचा वापर करून समाजासाठी एक आदर्श संदेश दिला आहे.

लाखा पर्यंत खर्च

अनेक वर्षापासून बँड बाजाची जागा डीजे या अत्याधुनिक वाद्यांनी घेतली आहे. बहुतेक लग्न समारंभ या शिवाय होत नाही ही वस्तुस्थिती आहे. वर पक्षाचा सर्वात पहिला खर्च होतो तो यावरच. यासाठी लाखा पर्यंत रुपये किंमत मोजावी लागते. यामध्ये लग्न तिथी दाट असल्यास या वाद्याचे भाव देखील वाढीव प्रमाणात द्यावे लागतात. काही अति उत्साही मंडळी धुळे मालेगाव, भुसावळ, अकोला येथूनही डीजे पाचरण करतात.दुसरीकडे डीजे मुळे मद्यपान करून धिंगाणा करणारे देखील दिसून येतात. त्यामुळे वाद देखील होण्याची शक्यता असते.कधी कधी हे वाद पोलीस ठाण्यापर्यंत जातात. निर्धारित पेक्षा जास्त ‘डेसिबल’ आवाज असला तर पोलीस दादा गुन्हे दाखल करतात तो वेगळाच.