नागपूर : आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरला जाणार आहत, अपेक्षा आहे, विठ्ठल त्यांना सदबुद्धी देईल व ते शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतील, असा टोला प्रहार जनशक्तीचे प्रमुख व माजी मंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला.शेतकऱ्यांसाठी त्यांचे काळ्या मातीचे शेतच शक्तिपीठ आहे. त्यांना कर्जमाफीच्या स्वरूपात न्याय हवा आहे, शक्तिपीठ नको, असे प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते व माजी मंत्री बच्चू कडू म्हणाले. ते नागपूर येथे एका न्यायालयीन प्रकरणासाठी आले असता न्यायालय परिसरात वृत्त वाहिन्यांशी बोलत होते.
कडू म्हणाले, शेतकऱ्यांना न्याय देणे हे सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे. आम्ही ८५ हजार कोटी रुपयांचा शक्तिपीठ महामार्ग मागितला नाही. तो शेतकऱ्यांवर थोपवला जात आहे. कर्जमाफीकडे दुर्लक्ष करण्यासाठी सोयीस्करपणे काही जणांचे खिसे भरले जात आहे. शक्तिपीठाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला प्रहारचा पाठिंबा आहे, असे कडू म्हणाले.
विरोधकांना संपवण्याचा भाजपचा प्रयत्न
नाना पटोले यांना विधानसभेतून एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले. त्याचा कडू यांनी निषेध केला. ते म्हणाले, भाजपला विरोधक नको, आणीबाणीसारखी सध्या परिस्थिती आहे, असे कडू म्हणाले.
कर्जमाफीबाबत ३ ला बैठक
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जमाफीबाबत ३ जुलैला बैठक बोलावली आहे. ते काय निर्णय घेतात हे पाहावे लागले. कर्जमाफीची घोषणा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी करतात की नंतर करतात याकडे लक्ष लागले आहे, असे कडू म्हणाले