नागपूर: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्यासह आदी शेतकरी नेत्यांनी नागपूरमध्ये आंदोलन केलं. त्यानंतर बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा पार पडली. यावेळी शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सूचवण्यासाठी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

यानंतर शुक्रवारी दुपारी नागपूर विमानतळावर पोचले असता बच्चू कडू आणि अन्य शेतकरी नेत्यांनी प्रसार माध्यमाची संवाद साधला. यावेळी बच्चू कडू यांनी सरकारने आम्हाला सहा महिन्यांचा वेळ मागितला असला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेल्याशिवाय सरकारला सोडणार नाही. कर्जमाफी न झाल्यास सरकारला सडो की पडू करू असा इशारा दिला.

शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सूचविण्यासाठी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल सादर करेल. शिफारशींचा अभ्यास करून ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी बाबत निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर शुक्रवारी बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले की, सरकारसोबत झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी सहा महिन्यांचा वेळ मागितलेला आहे. यासाठी समिती तयार करण्यात आली असून त्या माध्यमातून कर्जमाफी केली जाणार आहे. सरकारने वेळ मागितला असून आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे. याचा अर्थ आमचे आंदोलन थांबणार आहे असं नाही. सरकारने आंदोलन करण्याची आम्हाला वेळच येऊ द्यायला नको होती. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाईपर्यंत वारंवार आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारत राहणार आहोत, असेही बच्चू कडू म्हणाले.

तारखेपासून पडणाऱ्या सरकारला तारखेवर आणले – कडू

सरकारचा पैसा शेतकऱ्यांपर्यंत जात नाही तेव्हापर्यंत आंदोलन बंद होणार नाही. सरकारने दगा फटका दिल्यास बच्चू कडू फासावर जाण्यासही तयार असा इशाराही दिला. शेतकऱ्यांची परिस्थिती सरकारला माहिती आहे. त्यामुळे, सरकारने आंदोलनाची वेळच येऊ द्यायला नको होती. सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र सरकार स्थापन झाल्यावर यावर कोणीही बोलायला तयार नव्हते. त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली. शेवटी तारखेपासून पडणाऱ्या सरकारला तारखेवर आणले असेही कडू म्हणाले.

कटकारस्थान केल्यास कोणालाही सोडणार नाही

सरकारने वेळेत मार्ग काढला असता तर अशी वेळ आली नसती. आश्वासन दिल्यावरही सरकारने कटकारस्थान केल्यास कोणालाही सोडणार नाही. गुरुवारी रात्री बैठक झाल्यावर अनेक जण प्रतिक्रिया द्यायला लागलेले आहेत. मात्र, शेंगदाण्याची चव माहित नसणाऱ्यांनी काजूवर बोलू नये, असा इशाराही कडू यांनी दिला.

अजित दादांनी सांगितले आर्थिक परिस्थिती बिकटच

आर्थिक परिस्थिती विघट आहे माहिती आहे. बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे सांगितले. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी तुम्ही दरोडा टाका पण पण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीच पाहिजे,असेही बच्चू कडू म्हणाले.