नागपूर : मागील १३ वर्षांपासून सर्व क्षेत्रांमध्ये रस्ते सुरक्षेसंदर्भात जनजागृती करणाऱ्या ‘जनआक्रोश – फॉर बेटर टुमारो’ या नागपूरच्या ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थेला दिल्ली येथील सार्वजनिक बसेसच्या चालकांना रस्ते सुरक्षेसंदर्भात कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता आमंत्रित करण्यात आले आहे.
दिल्ली इंटिग्रेटेड मल्टीमॉडेल ट्रान्झिट सिस्टम लिमिटेडचे सहायक उपाध्यक्ष (रस्ते परिवहन) अजय कुमार श्रीवास्तव यांनी दिल्ली येथील परिवहन विभाग व दिल्ली परिवहन मंडळाच्या अंतर्गत येणा-या चालक प्रशिक्षण केंद्रातील वाहन चालकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्याची विनंती जनआक्रोशचे सचिव रवींद्र कासखेडीकर यांना केली आहे.
रवींद्र कासखेडीकर हे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे व्याही आहेत. जनआक्रोशचे अध्यक्ष प्रकाश खांडेकर म्हणाले, आम्ही नागपुरात आणि इतर ठिकाणी शाळा, महाविद्यालयांमध्ये तसेच, औद्योगिक संस्थांमध्ये जनजागृती अभियान राबवित असून विविध सार्वजनिक व खासगी संस्थांच्या चालकांना रस्ते सुरक्षेसंदर्भात कौशल्य प्रशिक्षण देत आहोत. असे प्रशिक्षण नागपूरला केल्यावर नुकतेच पुण्यातील महानगर परिवजन महामंडळाच्या चालकांसाठीदेखील प्रशिक्षण आयोजित केल्या गेले. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला. दिल्ली परिवहन मंडळाकडून आलेल्या आमंत्रणामुळे रस्ते सुरक्षेसंदर्भात देशभर जनजागृती करण्याची गरज असल्याचे लक्षात येते.
उपाध्यक्ष अनिल जोशी म्हणाले, आम्ही या अनुभवी चालकांमध्ये जनजागृती आणण्यासाठी एक विशेष अभ्यासक्रम तयार केला असून त्यात चालकांना रस्त्यावरून वाहन चालवितांना कोणती काळजी घ्यावी, वाहतूकीचे नियम कसे पाळावे, रोड सिग्नल्स आणि रोड साईन्सची माहिती असे किती आवश्यक आहे याबाबत जाणीव करून देण्यात येते.
दिल्ली येथे येत्या, १ ते ४ ऑगस्ट या तारखांना जनआक्रोशची चमू तेथील बस चालकांना रस्ते सुरक्षेसंदर्भात प्रशिक्षित करेल. दिल्ली येथील परिवहन आयुक्त निहारिका रॉय व डीआयएमटीएसचे संचालक श्री प्रिन्स धवन, आयएएस यांची उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती जोशी यांनी दिली.
‘जनआक्रोश’ या नावाने रविंद्र कासखेडकरी यांनी नागपुरात संस्था स्थापन केली. ही संस्था नागपुरातील स्थानिक प्रशासनावर आवाज उचलत होती. त्यामुळे नागपूर महापालिकेतील सत्ताधारी सतर्क होत. त्यामुळे जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात मदत होती. परंतु केंद्रात आणि राज्यात भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाचे सरकार आल्यानंतर या संस्थेने वाहतूक व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत केले. या संस्थेचे अनेक ज्येष्ठ नागरिक नागपुरातील चौका-चौकात फलक हातात घेऊन लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करत असतात.