नागपूर : प्रेमात बुडालेला व्यक्ती कधी काय करेल आणि कोणता मार्ग निवडेल, याचा नेम नसतो. बंगळूरू येथे प्रेयसीसाठी आपल्याच पत्नीचा खून करणाऱ्या डॉक्टरची घटना ताजी असतानाच नागपुरातही त्याची पुनरावृत्ती झाली. प्रेयसीच्या महागड्या छंदांमुळे आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी पैशांची गरज असल्याने गोवा येथील तरुणाने चक्क गुन्हेगारीचा मार्ग निवडत चोरीचा सपाटा सुरू केला. जाफर नगरमधील प्राध्यापकाच्या घरात घुसून त्याने ९ लाखांचे दागिनेही चोरले. मात्र नशिबाचे फासे उलटे फिरले आणि अवघ्या दोन दिवसांत तो गिट्टीखदान पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पॉल राजेंद्र सिंग चीमा (३२) असे प्रेयसीच्या प्रेमात वाहून जात चोर बनलेल्या आरोपीचे नाव आहे.
मूळचा गोवा येथील रहिवासी असलेला पॉल चिमा हा कपील नगरात किरायाच्या खोलीत राहतो. गोव्याच्या धर्तीवर नागपुरात कॉफी शॉप उघडण्याचे स्वप्न पाहत असलेला पॉल हा एका तरुणीच्या प्रेमात पडला. ही तरुणी नर्सिंगचे काम करून आजारी माणसांची सेवा करते. तिला चैनीच्या जीवनशैलीचा मोह आहे. त्यामुळे तरुणी सतत पॉलकडे वेगवेगळ्या महागड्या गोष्टींची मागणी करायची. यातूनच तो तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडही करायचा. तिला कामावर सोडून देण्यासाठी तो गिट्टीखदान परिसरातल्या जाफर नगरातही येत होता. ज्या ठिकाणी ही तरुणी रुग्ण सेवा करण्यासाठी येत होती, त्याच्या अगदी घराशेजारी प्रा. जेकब कुरीयन चामतील रहात होते.
फार्मसी कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले प्रा. जेकब २० ऑक्टोबला कुटुंबासह केरळ येथे गेले होते. नेमकी हीच बाब हेरून पॉलने प्रा. जेकब यांचे घर फोडून चोरी केली. दरम्यान केरळ येथून परत आल्यानंतर ३१ ऑक्टोबरला प्रा. जेकब यांना घराच्या स्वयंपाक खोलीचा दरवाजा तुटलेला दिसला.
या चोरीचा तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना आरोपीची ओळख पटली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पॉल चीमाला अटक केली. पॉल हा वर्षभरापासून म्हाडा क्वार्टर्स कॉम्प्लेक्समध्ये मैत्रिणीसोबत राहत होता. पॉल हा तरुणीशी लग्न करू इच्छित होता. तो नागपुरात गोव्याच्या धर्तीवर कॅफे उघडण्याचेही स्वप्न पहात होता. मात्र आर्थिक अडचणींमुळे त्याने चोरीचा पर्याय निवडला आणि हा गुन्हा केला. सध्या, गिट्टीखाना पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी पॉलकडून प्रत्येकी २५ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे लॉकेट, ४, ५ आणि ८ ग्रॅम वजनाच्या अंगठ्या, ५ ग्रॅम वजनाचे कानातले रिंग, ३० ग्रॅम वजनाच्या पाटल्या आणि रोख २ लाख रुपये जप्त केले आहेत.
