नागपूर : गुजरातमधील बडोदा जिल्ह्यात महिसागर नदीवरील पूल कोसळण्याच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या १७ झाली आहे. बुधवारी सकाळी बडोदा येथील पाड्रा शहराजवळील गंभीरा गावाजवळ आनंद आणि बडोदा जिल्ह्यांना जोडणाऱ्या चार दशके जुन्या पुलाचा काही भाग कोसळला होता. यात पुलावरील अनेक वाहने महिसागर नदीत कोसळली. ही घटना ताजी असतानाच महाराष्ट्रात नागपूर जवळ एक उड्डाणपूल उद्घाटनापूर्वीच खचल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त करताच कंत्राटदाराने डागडुजी केली.
नागपूर जिल्ह्यात उड्डाणपूल खचला. उड्डाणपूल बांधून तयार झाला आणि उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामठी ते न्यू कामठील जोडणाऱ्या उड्डाणपुलावर मंगळवारच्या पावसामुळे मोठमोठे खड़े पडले असून, काही भाग खचला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गृह जिल्हा नागपूर येथे ही घटना घडली. नेत्यांनी नाराजी व्यक्त करताच कंत्राटदाराने खड्डे बुजवले.
या उड्डाणपुलावरून रहदारी सुरू झाली असती तर मोठी दुर्घटना झाली असती. सुदैवाने उद्द्घाटन न झाल्याने ती टळली आहे. मोठमोठे खड्डे पडलेल्या पुलाचा व्हिडीओ एका नागरिकाने सोशल मीडियावर शेअर केला असून, तो प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये पुलाचा काही भाग खोलवर बसलेला स्पष्ट दिसतो. यामुळे बांधकामाच्या दर्जाचाबत आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
विकासाच्या नावाखाली नागपूर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. मात्र बांधकामाचा दर्जा खालावला आहे. त्यामुळेच उड्डाणपूल उद्द्घाटन होण्यापूर्वीच खचला असून त्यावर खड्डा पडला आहे.
हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, कंत्राटदाराचा निष्काळजीपणा पुढे आला आहे. सार्वजनिक पैशातून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पांमध्ये अशी अनियमितता होत असल्याबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. हा सार्वजनिक निधीचा अपव्ययच नाही, तर हा लोकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचा संतप्त सवाल नागरीकांकडून केला जात आहे.
या पुलाचे तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित कंत्राटदाराला काल्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी होत आहे. याकडे शासनाने दुर्लक्षित केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते. पायाभूत सुविधांच्या विकासकामात पारदर्शकता असावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान, गुजरातमधील बडोद्याचे जिल्हाधिकारी अनिल घामेलिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेनंतर किमान तीन जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) यांच्या पथकांनी नदीत शोधकार्य सुरू केले आहे. आमच्याकडे उपलब्ध यादीनुसार, आतापर्यंत १५ मृतदेह सापडले, तर तीन जण अजूनही बेपत्ता आहेत. इतर बेपत्ता व्यक्तींबद्दल माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्षाला संपर्क साधण्याचे आवाहन धामेलिया यांनी केले.
विरोधी पक्षाची टीका
महिसागर नदीवरील पूल कोसळल्याच्या घटनेनंतर काँग्रेसने गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या राजीनाम्याची मागणी करत गुरुवारी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले. राज्यात गेल्या चार वर्षांत तब्बल १६ पूल कोसळल्याच्या घटना घडल्याचा दावाही काँग्रेसने केला. तसेच या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी करत ती पूर्ण न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे. अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर देश सावरला दुर्घटना घडल्याचे खरगे यांनी नसताना बडोदा येथील पूल ‘एक्स’वर म्हटले आहे.