नागपूर : नागपुरातील एका खासगी रुग्णालयातील चलचित्र समाज माध्यमांवर प्रसारीत झाले आहे. त्यात पैसे वेळेवर दिले नसल्याने इंजेक्शन देऊन रुग्णाला मारल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळले असून या घटनेबाबत आपण जाणून घेऊ या.

नागपुरातील बुटीबोरी परिसरात मोठी औद्योगिक वसाहत आहे. येथे विविध औद्योगिक कंपन्यांमधून विविध वस्तूंचे उत्पादन घेतले जाते. येथील एका कंपनीत काही दिवसांपूर्वी अपघात झाला. तेथून गंभीर अवस्थेत रुग्ण उपचारासाठी तेथील एका खासगी रुग्णालयात दाखल केला गेला. यावेळी नातेवाईकांना कळल्यावर तेही रुग्णालयात पोहचले.

नातेवाईकांच्या आरोपानुसार सुरवातीला डाॅक्टरांनी रुग्णासाठी प्रकृती गंभीर नसल्याची माहिती दिली. परंतु काही तासानंतर अचानक रुग्ण गंभीर असल्याचे सांगितले. दरम्यान नातेवाईकांना डाॅक्टरांकडून रुग्णालयात एक लाख रुपये जमा करण्याचा आग्रह करणे सुरू झाले. नातेवाईकांनी एवढी रक्कम नसल्याचे सांगत रक्कम जमवण्याचा प्रयत्न सुरू केला.

दरम्यान रुग्णाला बघण्यासाठी नातेवाईकांना अतिदक्षता विभागात जाऊ दिले जात नव्हते. येथे नियमांवर बोट ठेवत दिवसा एक तास आणि संध्याकाळी एक तासच रुग्णाला बघणे शक्य असल्याचे सांगितले जायचे. येथील दार रुग्णालय कर्मचाऱ्याच्या बायोमेट्रिकशिवाय उघडलेही जात नव्हते.

एकदा नातेवाईक संतापल्यावर जबरदस्तीने आत गेले. त्यावेळी रुग्णाची बाॅडी कडक होऊन त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनात आले. त्यांनी उपस्थितांना विचारणा केल्यावर मात्र रुग्णाचा नुकताच मृत्यू झाल्याचा दावा केला. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला.

याबाबत रुग्णालयातील अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर रुग्ण गंभीर स्थितीत उपचाराला आला होता. त्याबाबत नातेवाईकांना कळवून त्यांची उपचाराबाबतची संमतीही घेतली गेली. अतिदक्षता विभागात रुग्णांना संक्रमनाचा धोका असल्याने येथे नातेवाईकांना निवडक वेळाच प्रवेश दिला जातो. त्यामुळे नातेवाईक गैरसमजातून आरोप करत असल्याचा दावा केला. या घटनेमुळे रुग्णालयातील कामावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे.

पैसे दिले नाही तर रुग्ण घेतला कशाला

समाज माध्यमावर प्रसारित व्हिडिओमध्ये डाॅक्टरांनी एक लाख रुपये मागितल्यावर नातेवाईकांना ते देणे शक्य नव्हते. त्यामुळे डाॅक्टरांनी रुग्णाला दाखलाच कसा दिला?, त्यांनी सांगितले असते तर रुग्णाला शासकीय रुग्णालयात हलवून तेथेही चांगला उपचार शक्य असल्याचा दावा नातेवाईक करतांना दिसत आहे. त्यामुळे नागपुरातील खासगी रुग्णालयांमध्ये चालले काय? हा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.