अकोला : वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. दीप उत्सवामध्ये प्रत्येक जण गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेत असतात. या सणासुदीच्या दिवसांमध्ये विकतचे गुलाबजाम, पेढे, बर्फी व इतर मिठाई विकत घेऊन खात असाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. अन्यथा तुमचे आरोग्य देखील धोक्यात येऊ शकते. दिवाळीच्या काळात गोड पदार्थांच्या विक्रीत प्रचंड वाढ होते. ग्राहकांची वाढलेली मागणी लक्षात घेता भेसळ होण्याचा धोका निर्माण होतो. भेसळीच्या गैरप्रकाराला रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवली जात आहे.

‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा’ या उपक्रमाद्वारे सणासुदीनिमित्ताने तुप, तेल, मिठाई, खारे पदार्थ व इतर अन्न पदार्थ उत्पादक दुकानांची तपासणी व अन्न नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. गुलाबजाम, श्रीखंड, बासुंदी, पेढे, बर्फी व इतर गोड पदार्थांना सणांच्या काळात अधिक मागणी असते. कच्चा माल म्हणून खवा वापरला जातो. वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन अनेक जण खव्यात भेसळ करतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचतो. असे प्रकार घडू नयेत, यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी तपासण्या व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे शहरात व जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी मोहीम राबवली जात आहे.

विकतच्या पदार्थात आढळले होते पालीचे मुंडके, झुरळ

अकोला शहरात ग्राहकांनी हॉटेलमधून घेतलेल्या अन्न पदार्थांत पालीचे मुंडके, झुरळ आढळल्याच्या धक्कादायक घटना नुकत्याच घडल्या आहेत. या प्रकरणात चौकशी देखील केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘एफडीए’ने दिवाळी लक्षात घेऊन तपासणी मोहिमेला अधिक व्यापक स्वरूप दिले.

५७ नमुन्यांची तपासणी; १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत आजपर्यंत एकूण ५७ अन्न नमुने घेण्यात आले आले आहेत. त्यामध्ये दुध ११, खवा सात, तुप पाच, खाद्यतेल आठ, मिठाई सात, डायफ्रुड्स चार व इतर १२ अन्न नमुने घेण्यात आले आहेत. आतापर्यंत ३० दुकानांना सुधारणा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. एकूण सहा प्रकरणांत भेसळीच्या संशयावरून १४ हजार ८०८ किलो १९ लाख १६ हजार ८७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक आयुक्त दे. गो. वीर यांनी दिली.