उन्हाच्या काहिलीत न्हाऊन निघणाऱ्या नागपूरकरांना शुक्रवारी मान्सूनपूर्व पावसाच्या कोसळलेल्या सरींनी चिंब भिजवले. अचानक आलेला या पावसाने दाणादाण उडवली खरी, पण त्यातही पाऊस कोसळल्याचा आनंद मोठा होता. शाळांना अजून पुरती सुरुवातच व्हायची असल्याने चिमुकल्यांनी बाहेर निघत मान्सूनपूर्व पावसाचा मनसोक्त आनंद लुटला, तर नागरिकांमध्येही पाऊस कोसळल्याचा उत्साह होता.

सकाळपासूनच आकाशात दाटून आलेल्या ढगांनी पावसाची नांदी दिली. सकाळच्या सुमारास हलकासा शिडकावा करणारा पाऊस, दुपारी प्रचंड मेघगर्जनेसह धो-धो बरसला. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात या पावसाला अनेकांनी मान्सूनची उपमा दिली. तासभर बरसलेल्या पावसाने जनजीवन मात्र विस्कळीत केले. उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर दुकान थाटून बसलेल्या किरकोळ विकेत्यांची चांगलीच धावपळ उडाली. तर वाहनचालक आणि पादचाऱ्यांनी मिळेल तिथे आडोसा शोधला. त्याचवेळी काहींनी ‘पहिला पाऊस, पहिली आठवण’ असे म्हणत पावसात चिंब भिजण्याचा आनंदही लुटला. उकाडय़ामुळे मंदावलेली चहाटपरीवरची गर्दीही तासाभराच्या पावसाने वाढलेली दिसून आली. पाऊस म्हणजे गरमागरम भजी, पकोडे आणि सोबतीला चहा असा बेतही या तासाभराच्या पावसाने सीताबर्डीसारख्या परिसरात जमलेला दिसून आला. मान्सूनची नांदी देत बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसाने वातावरणात बराचसा गारवा तयार झाला. मात्र, त्याचवेळी कमी वेळात जोरदार बरसलेल्या पावसाने पुन्हा एकदा शहराचे बिघडलेले व्यवस्थापन समोर आणले. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. कित्येक ठिकाणी वीजदेखील गेली होती. रस्त्यावरही ठिकठिकाणी लहान झाडे कोसळलेली दिसून आली, तर मोठय़ा झाडांच्या फांद्याही तुटून पडलेल्या दिसून आल्या. एक मात्र खरे की दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या नागपूरकरांना मान्सूनपूर्व कोसळलेल्या पावसाच्या सरींनी चांगलाच दिलासा दिला.