नागपूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी २३ ऑगस्टला प्रसिध्द केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर ४ सप्टेंबर पर्यंत प्राप्त झालेल्या एकुण ११५ हरकती व सुचनांवर मंगळवार ९ सप्टेंबरला सकाळी ११.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, आयुक्त यांचे सभा कक्ष, नागपूर महापालिका, मुख्यालय, सिव्हिल लाईन नागपूर येथे सुनावणी घेण्यात येणार आहे.

महापालिकेमार्फत सर्व संबंधित आक्षेप कर्त्यांना उपस्थित राहणेबाबत नोटीस पाठविण्यात आल्या आहे. आक्षेप कर्त्यांना नोटीस मिळणे संदर्भात काही अडचण असल्यास त्यांनी निवडणूक विभाग, मुख्यालय, मनपा सिव्हील लाईन्स, नागपूर येथे संपर्क साधता येईल. ही सुनावणी घेण्यासाठी नगर विकास विभाग यांचे प्राधिकृत अधिकारी महाराष्ट्र मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली असून यांच्या समक्ष सुनावणी होणार आहे. त्यांचेसोबत आयुक्त तथा प्रशासक महापालिका नागपूर हे देखील सुनावणीस उपस्थित राहणार आहेत.

नागपूर महापालिका निवडणूकीच्या प्रभाग रचनेच्या प्रारुपावर शेवटच्या दिवशी गुरुवारी ३१ आक्षेप प्राप्त झाले. त्यामुळे आतापर्यंत महापालिकेला ११५ आक्षेप प्राप्त झाले आहेत. या आक्षेपावर आता सुनावणी होऊन लवकरच अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडून आक्षेप नोंदवण्यात आले. शेवटच्या दिवशी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अभिजीत वंजारी आणि माजी स्थायी समिती सभापती विजय झलके यांनी आक्षेप नोंदवले.

प्रभाग रचनेचे प्रारुप जाहीर झाल्यानंतर त्यावर २३ ऑगस्टपासून हरकती व सूचना मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. गुरुवारी आक्षेप नोंदवण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी आक्षेप नोंदवत विधानसभा मतदारसंघाप्रमाणे प्रभाग रचना करण्यात यावी. त्यामुळे लोकप्रतिनिधी व नागरिकांना अधिक सुविधाजनक होईल. तर काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अभिजीत वंजारी यांनी प्रभाग २६ व २७ च्या सीमांकनाबद्दल आक्षेप घेतला आहे. या दोन्ही प्रभागांमधील काही भाग एकमेकांना जोडण्यात आले आहे. सुमारे सात हजार लोकसंख्या असलेले प्रभाग २६ मध्ये जोडण्यात आलेले भाग प्रभाग २७ मध्ये जोडण्यात यावे अशी मागणी वंजारी यांनी केली आहे.