नागपूर : गो मांस विक्री आणि वाहतूकीवर बंदी असताना ग्रामीण भागातून कत्तलीसाठी गो धनाची तस्करी करणाऱ्यांना पकडत त्यांना विवस्त्र करून मारहाण झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. शहरापासून जवळच असलेल्या दिघोरी परिसरात रविवारी रात्री १२ च्या सुमारास ही घटना घडली.

हिंदू एकता प्रतिष्ठानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सर्व गो तस्करांना विवस्त्र करत त्यांना हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आणेपर्यंत मारहाण केल्याचीही माहिती मिळत आहे. पवनी भंडारा मार्गे नागपुरात गोतस्करीचं वाहन येणार असल्याची कुणकूण हिंदू एकता मंचला लागली होती. त्यानंतर पवनी – उमरेडकडून येणारे प्रत्येक वाहन कार्यकर्त्यांनी अडवून त्याची पाहणी केली. यात एका चारचाकी वाहनात गो तस्करी सुरु असल्याचे दिसताच ही गाडी गोरक्षकांनी पकडली आणि गो तस्करी करणाऱ्यांना जाब विचारला. त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत वाद घातल्याने गो तस्कर आणि गोरक्षकांमधील शाब्दिक चकमहही उडाली.

त्यामुळे संतापलेल्या गोरक्षकांनी गो तस्करांना पकडून विवस्त्र केले. नंतर त्यांना हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आणेपर्यंत मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. हिंदू एकता प्रतिष्ठानचे स्वप्नील साळुंखे यांच्या कार्यकर्त्यांनी ही गो तस्करी पकडली होती. तस्करांना पकडून हुडकेश्वर पोलिसांकडे सोपवण्यात आले.

गो तस्करीची सलग तिसरी घटना

कळमेश्वर तालुक्यातल्या फेट्री ते गोरेवाडा दरम्यान फेट्री शिवार परिसरात रविवारी पहाटे साडेचारला लागलेल्या भीषण आगीत ट्रकमध्ये दाटीवाटीने कोंबलेले २९ गोधन होरपळून खाक झाले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी उमरेडमार्गावर कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ११ गोवंशीय जनावरांची पोलिसांनी तस्करांच्या तावडीतून सुटका केली होती. त्यामुळे ग्रामीण भागातून होणारी गो तस्करी पुन्हा एकदा एरणीवर आली आहे.