जामठ्यात खेळल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यासाठी दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. सामना संपल्यानंतर रात्री परत येताना रस्त्यावर गर्दी होऊ नये म्हणून जामठा ते रहाटे कॉलनी असा ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात होणारी संभाव्य कोंडी टाळता येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी निवडक पत्रकारांशी बोलताना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुक्त म्हणाले, शुक्रवारी सायंकाळी सात वाजता हा सामना होणार आहे. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, जामठा स्टेडियम, रेडिसन ब्ल्यू आणि ली मेरिडन या ठिकाणी बंदोबस्त असेल. २१ ते २४ असा हा बंदोबस्त राहणार असून विदेशी दर्शक आणि पाहुण्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष असणार आहे. स्टेडियमच्या १३ प्रवेशद्वारांवर पोलीस राहणार असून मैदानामध्ये विदर्भ क्रिकेट असोशिएशनने खासगी सुरक्षा रक्षकांची व्यवस्था केली आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून विशेष नियोजन करण्यात आले आहे. तब्बल ६०० पोलीस यासाठी तैनात असतील. ७ पोलीस उपायुक्त, १० सहायक आयुक्त, ३५ निरीक्षक, १३८ सहनिरीक्षक आणि १६०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तात तैनात राहणार आहेत. मैदानाच्या काही अंतरावर वाहनतळ असून मैदानापर्यंत बससेवा देण्यात आली आहे, अशी माहितीही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

हेही वाचा : गडचिरोली : सहा लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षल्यांचे आत्मसमर्पण ; छत्तीसगडच्या महिला नक्षलीचाही समावेश

यापूर्वी नागपुरात झालेल्या एका आंतरराष्ट्रीय सामन्यात सट्टेबाज आणि बुकींचा हस्तक्षेप समोर आला होता. यामुळे यावेळी सट्टेबाजी करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सायबर टीम सज्ज ठेवली आहे. शहरातील काही क्रिकेट बुकी आणि सट्टेबाजांच्या हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे अशा प्रकारात कुणीही आढल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला. या सामन्याची १५ मिनिटात ऑनलाईन तिकिट विक्री झाल्यामुळे यात घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांना लक्ष्य केले आहे, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur cp amitesh kumar watchful eye cricket bookies green corridor sports lovers returning from jamtha tmb 01
First published on: 21-09-2022 at 16:22 IST