नागपूर : देवलापार येथे ६ दिवसांपूर्वी ट्रकने दुचाकीवरून निघालेल्या जोडप्याला धडक दिली. यात एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर जे घडले ते पाहून अख्खे शहर हळहळले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला उचलण्यासाठी एकही जण मदतीला समोर येत नसल्याने पतीने अखेर तिचा मृतदेह दुचाकीला बांधून घर गाठले.
हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच, पोलिसांनी तपसाची चक्रे गतीमान केली आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घेऊन बेजबाबदार ट्रक चालकाला अखेर अटक करीत गुन्ह्याची उकल केली. कृत्रिम बुद्धीमत्तेतले मार्वल टूल वापरून ग्रामीण पोलिसांनी हा हायटेक तपास केला. ६ दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेनंतर अवघ्या काही दिवसांत ग्रामीण पोलिसांनी तब्बल ७०० किलोमिटर दूर जाऊन उत्तर प्रदेशातून अटक केली. दोषी ट्रकचालकाला शोधून काढत त्याला बेड्या ठोकल्या.
पत्नीचा मृतदेह दुचाकीवरून वाहून नेण्याची वेळ ओढवलेल्या प्रसंगाला प्राणांतिक अपघात हे कारण ठरल्याचे निष्पन्न झाले होते. घटनेच्या ६ दिवसांत ग्रामीण पोलीलांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या ट्रक चालकाचा कृत्रिम बुद्धेमत्तेच्या सहाय्याने पाठलाग करीत त्याला उत्तर प्रदेशातून अटक केली. देवलापार पोलीसांनी या प्रकरणात बेजबाबदार ट्रक चालक सत्यपाल राजेंद्र (२८) याला उत्तर प्रदेशातील फरुखाबाद जिल्ह्यातल्या महोई येथून ताब्यात घेतले.
पोलीसांनी या प्रकरणात ज्या ट्रकमुळे अपघात घडला आणि अमित भुरा यांची पत्नी ग्यारसी दगावली तो यु. पी. १४ एम. टी. २१९० हा ट्रकही ताब्यात घेतला आहे. ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणात कृत्रिम बुद्धीमत्तेचे मार्व्हल टूल वापरून ट्रकचा माग काढला. त्या आधारे ट्रक चालकालाही अटक करण्यात आली.
काय आहे मार्वल टूल
विविध गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी पोलीस क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम्स (सीसीटीएनएस) ही एक राष्ट्रव्यापी एकात्मिक प्रणाली वापरली जाते. जी पोलिस स्टेशनचे डिजिटायझेशन आणि नेटवर्किंग करून पोलिसिंग वाढविण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ती कार्यक्षम आणि प्रभावी कायदा अंमलबजावणीसाठी गुन्हेगारी आणि गुन्हेगारी डेटाचे संकलन, सामायिकरण आणि विश्लेषण सुलभ करते. नव्या मार्वेल टूलमधून एक प्रतिमा तयार करीत इंटरनेटच्या माध्यमातून त्याचा मागोवा घेतला जाऊ शकतो.
असा लागला सुगावा
देवलापार येथे अपघात झाल्यानंतर हा ट्रक चालक पळून गेला होत्या. त्यानंतर पोलिसांनी पीडिताला ट्रकबाबत माहिती मागितली. त्यात पीडिताने संबंधित ट्रक लाल रंगाचा होता, अशी माहिती दिली. सोबतच पोलिसांनी या घटनेची झळ बसलेल्याला ट्रकसंबंधी आणखी काही विचारले. त्यात ट्रकला किती चाकं होती, ताडपत्री होती का अशी माहितीही विचारली. त्या आधारावर पोलिसांनी एआयच्या मदतीने एक चित्र तयार केले. ते चित्र हा ट्रक ज्या ज्या मार्गाने जाणार होता, त्या त्या मार्गावरच्या सीटीटीव्हीत शोधण्यात आला. ज्याप्रमाणे संगणकावर लाखो फाईलमधून एखादी फाईल शोधली जाते, त्या प्रमाणे लाखो फुटेजमधून या ट्रकशी साधर्म्य आढळलेल्या ट्रकचा शोध घेण्यात आला. यात याच महामार्गावर याच रंगाचे पाच ट्रक पोलिसांना सापडले. त्यानंतर पोलिसांनी पाचही ट्रकची चौकशी केली. पोलिसानी ई वे बीलही तपासले. या सगळ्या बाबी इंटर लिंकअसल्याने त्या एकत्र सापडू शकल्या. पोलिसांनी इंटरनेटवर उपलब्ध महामार्गावरील फास्ट टॅगच्या पावत्या, शेकडो तासांचे फुटेज. इ वे बीलचे स्कॅनिंग करत शेवटी एका ट्रकवर लक्ष केंद्रित केले. हा ट्रक पोलिसांना महामार्गावरील ग्वाल्हेरजवळ असल्याचे आढळले. ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ७०० किलोमीटर दूरवर जाऊन आरोपीला ट्रकसह ताब्यात घेतले.