नागपूर : यंदा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्या शाळांना १२९ दिवस सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये रविवारचा समावेश आहे.त्यात आता १२ सुट्ट्या दिवाळीत दिल्या जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, ५३ सुट्ट्या या रविवारच्या असणार आहे.

सण-उत्सवानिमित्त ६७ सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वर्षात २२० दिवस अध्यापनाचे असणार आहे. याचसोबत जवळपास ४४ दिवस उन्हाळी सुट्ट्या असणार आहे. याआधी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पहिली ते नववीच्या परीक्षा उरकल्या जायच्या. आता ८ ते २५ एप्रिलपर्यंत या परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आता २५ एप्रिलनंतर १४ जून या कालावधीत शाळांना सुट्टी असणार आहे.

यामध्ये यावर्षी दिवाळीच्या सुट्ट्या फार कमी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी महत्त्वाच्या निर्णय घेतलेला आहे. यावरून आता दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अचानक वाढ करण्यात आलेली आहे.

सीबीएसई शाळांनी १ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या द्याव्यात अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी दिला आहे. त्यानुसार शाळांनीही आता ३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याचे संदेश पालकांना पाठविणे सुरू केले आहे. सीबीएसई स्कूल स्टाफ वेल्फेअर असोसिएशनच्या (सिस्वा)अध्यक्षा दिपाली डबली यांनी यासंदर्भात शिक्षण विभागाला पत्र पाठवून मागणी केली होती.

सीबीएसई शाळांना दिवाळी, ख्रिसमस तसेच उन्हाळी सुट्या देणे अनिवार्य आहे. दिवाळी सुट्यांचा कालावधी १८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर, ख्रिसमस २२ ते २५ डिसेंबर, तसेच उन्हाळी सुट्या नियमानुसार देणे अनिवार्य आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने १५ सप्टेंबरला परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते. यानंतरही अनेक शाळांनी धनत्रयोदशी व नंतरही नियमित शाळा सुरू ठेवत केवळ २८ ऑक्टोबरपर्यंतच दिवाळी सुट्या जाहीर केल्या होत्या. या प्रकाराची गंभीर दखल घेत सिस्वाच्या वतीने शिक्षण विभागाला पत्र देण्यात आले होते.

यानंतर शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी १५ सप्टेंबरच्या परिपत्रकाचे काटेकोर पालन करावे, अन्यथा संबंधित शाळांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. २ नोव्हेंबरला रविवार आल्याने आता सर्वच सीबीएसई शाळा ३ नोव्हेंबरपासून सुरू होतील. परिपत्रकाची अवहेलना झाल्यास संबंधित शाळांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.