नागपूर : शहरात मागील दीड वर्षांत ५४० प्रकरणांत ६.३९ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले व ७३० आरोपींना अटक करण्यात आली. त्यापैकी बऱ्याच प्रकरणांचे तार मुंबईसह राजस्थान, मध्य प्रदेश, ओदिशा व इतर काही राज्यांशी जुळले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली.

पोलीस आयुक्त कार्यालयात बुधवारी झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. डॉ. सिंगल पुढे म्हणाले, शहर नशामुक्त करण्यासाठी पोलिसांकडून ‘ऑपरेशन थंडर- एकत्र येऊ या, नशामुक्त समाज घडवू या’ हा उपक्रम दीड वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला. त्याअंतर्गत १ मार्च २०२४ ते १७ जून २०२५ दरम्यान ५४० प्रकरणांत विविध प्रकारचे ६०९ किलो अंमली पदार्थ जप्त केले गेले. त्यांची किंमत ६ कोटी ३९ लाख रुपये ८३ हजार ४३५ रुपये होती.

या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी ७३० आरोपींना अटक केली. सूक्ष्म तपास सुरू केला असता काही प्रकरणांचे तार मुंबई, राजस्थान, मध्य प्रदेश, ओदिशापर्यंतच्या गुन्हेगारांशी जुळत असल्याचे पुढे आले. या प्रकरणात शेवटच्या आरोपीपर्यंत पोहचून अंमली पदार्थाची साखळी उद्ध्वस्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही डॉ. सिंगल यांनी सांगितले. या पत्रपरिषदेला सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, वसंत परदेशी, डॉ. शिवाजी राठोड, लोहित मतानी, महक स्वामी, डॉ. अश्विनी पाटील, निकेतन कदम, राहुल माकनीकर, अर्चित चांडक, श्वेता खेडकर उपस्थित होते.

सिंबा ॲपमध्ये आरोपींची नोंदणी

पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत शहरातील अंमली पदार्थ तस्कारांच्या घरांची झडती घेतली. आरोपींचे भ्रमणध्वनी तपासले. सर्व आरोपींचे छायाचित्र, बोटाचे ठसे सिंम्बा ॲपमध्ये आहेत. त्यामुळे यापुढे कुणा आरोपीला अटक केल्यास त्याच्याबाबतची माहिती लगेच समोर येऊन कडक कारवाई करणे शक्य होईल, असेही डॉ. सिंगल यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाळा परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई

शाळेच्या ५०० मीटर परिसरात तंबाखू, गुटखा, पानमसालासह प्रतिबंधात्मक वस्तूंची विक्री करता येत नाही. त्यानंतरही शहरात बऱ्याच शाळा परिसरात सर्रास या वस्तू विकल्या जात आहेत. याबाबत डॉ. सिंगल म्हणाले, पोलिसांनी सर्व शाळांच्या व्यवस्थापन, प्राचार्यांना पत्र देत अशा प्रकारांबाबत माहिती देण्याची विनंती केली आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांना तंबाखूसह इतर व्यसन असल्यास ते सोडवण्यासाठी प्रत्येक शाळेत समुपदेशकाची नियुक्ती, शाळानिहाय नार्कोटिक क्लब स्थापन करण्याची विनंती केल्याचे डॉ. सिंगल यांनी सांगितले.