नागपूर : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी मंगळवारपासून नागपुरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा तिढा तिसऱ्या दिवशीही कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबईत चर्चा करण्याचे ठरले असून गुरूवारी माजी आमदार बच्चू कडू आणि इतर नेते मुंबईकडे रवाना झाले आहेत.

आंदोलकांच्या शिष्टमंडळात बच्चू कडू, अजित नवले, महादेव जानकर, वामनराव चटप, रविकांत तुपकर यांच्या समावेश राहणार आहे. ही सर्व मंडळी आज दुपारी १.५५ मिनिटांनी नागपूर-मुंबई या विमानाने मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान, राज्यमंत्री पंकज भोयर आणि राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी काल रात्री साडेआठच्या सुमारास प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली.

त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून कडू यांची चर्चा झाली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचे चर्चेचे निमंत्रण स्वीकारले होते. तसेच रस्ते मोकळे करून नियोजित ठिकाणी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

आधी आंदोलकांनी सरकारला दुपारी ४ वाजता चर्चेची वेळ दिली होती. पण, मंत्री उशिरा पोहोचले. त्यावरूनही आंदोलकांनी मंत्र्यांना फैलावर घेतले. न्यायालयाने आंदोलनाबाबत आदेश दिल्यानंतर तुम्ही चर्चेला आले यावरून हे सर्व राज्य सरकारने ठरवून केल्याचे दिसते. कर्जमाफी करणार असे आश्वासन दिले तरच या चर्चेला अर्थ आहे, असे आंदोलकांनी मंत्र्यांना स्पष्ट शब्दात सुनावले.

दरम्यान, उच्च न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल करून घेत बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आंदोलकांना महामार्गावरून हटवण्याचे नागपूर पोलिसांना निर्देश दिले. परंतु, मागण्या पूर्ण होईपर्यंत हलणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. नागपूर-वर्धा मार्गावरील पांजरा येथील कापूस संशोधन केंद्राजवळ हजारो आंदोलक एकत्र आल्याने बुधवारी दिवसभर नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. दरम्यान, बुधवारी सकाळी काही आंदोलक रेल्वे रुळांवर उतरले आणि रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न केला तर काहींनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर टायर जाळत सरकारचा निषेध व्यक्त केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर राज्य सरकारने राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल आणि पंकज भोयर हे आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे जाहीर केले. आंदोलक दिवसभर राज्य सरकारच्या प्रतिनिधींची प्रतीक्षा करीत होते. परंतु, लोकांना त्रास होत असल्याने न्यायालयाने स्वत:हून दखल घेत सायंकाळी ६ वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी न्यायालयाचे आदेश घेऊन आंदोलनस्थळी धाव घेतली, पण आंदोलकांचा विरोध पाहता त्यांना परत जावे लाग