नागपूर: रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांत शिकणाऱे विद्यार्थी तसेच काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांपर्यंत सगळेच मानसिक तणावाशी झुंजत आहे. त्यातून काही डॉक्टर आत्महत्याही करतात. या आत्महत्या थांबवण्यासाठी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने (फैमा) एक हेल्पलाईन सुरू केली आहे. त्याद्वारे समुपदेशनातून देशभरातील डॉक्टरांच्या आत्महत्या थांबवण्याचा प्रयत्न होत आहे. या उपक्रमाबाबत आपण जाणून घेऊ या.

देशभरात डॉक्टरांच्या वाढत्या आत्महत्या चिंतेचा विषय आहे. जुलै २०२५ मध्ये मुंबईच्या जे.जे.हॉस्पिटलमधील एका डॉक्टरने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली होती. हा डॉक्टर निवासी डॉक्टरांच्या संघटनेशी संबंधित होता. सरकारने २०१७ मध्ये मानसिक आरोग्यासाठी नियम बनवले. परंतु डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याबद्दल फारशी चिंता कुणीही करत नाही. ही गरज पाहून, देशातील निवासी डॉक्टरांची राष्ट्रीय संघटना, फैमाने हेल्प लाईनचा चांगला उपक्रम हाती घेतला आहे. देशातील सुमारे ५० मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने पूर्णपणे मोफत ही हेल्पलाइन आहे.

डॉक्टरांची आत्महत्या थांबवण्याची कल्पना नागपुरातील मेडिकल महाविद्यालयातून एमबीबीएस आणि पदव्यूत्तर शिक्षण घेतलेल्या डॉ. सजल बंसल यांनी मांडली. त्यानंतर फैमाचे अध्यक्ष डॉ. मनीष जांगरा आणि डॉ. अक्षय डोंगरदिवे यांनी त्यावर काम सुरू केले. झारखंडचे डॉ. जयदीप जयदीप चौधरी, महाराष्ट्राचे डॉ. सजल बंसल, आंध्र प्रदेशचे डॉ. श्रीनाथ या हेल्पलाइनचे समन्वयक आहे. या उपक्रमात देशातील विविध राज्यांतील मानसोपचारतज्ज्ञांसह महाराष्ट्रातील डॉक्टर देखील वेळेवर हेल्पलाईनवर समुपदेशनाची सेवा देणार आहे.

या हेल्पलाईनचा क्रमांक देशातील सर्व निवासी डॉक्टरांची संघटना देशातील सर्व निवासी डॉक्टर आणि एमबीबीएस विद्यार्थ्यांपर्यंत महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डसह इतरही संघटनेद्वारे पोहचवला जाणार आहे. संघटनेच्या यशस्वीतेसाठी डॉ. रोहन कृष्णन, डॉ. सुरवंकर दत्ता, डॉ. संदीप डागर यांच्यासह सर्व फैमाचे पदाधिकारी व सदस्य काम करत आहे.

काम कसे चालणार ?

फैमाच्या राष्ट्रीय हेल्प लाईनवर विविध वेळेवर वेगवेगळे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. हे मानसोपचार तज्ज्ञ विविध भाषाही जाणतात. या सगळ्याच डॉक्टरांचे भ्रमनध्वनी क्रमांक सर्वत्र प्रसारीत केले गेले आहे. त्यात संबंधित मानसोपचार तज्ज्ञाला कोणती भाषा येते तेही नमुद असेल. त्यामुळे समुपदेशनाची गरज असलेला निवासी डॉक्टर वा वैद्यकीय विद्यार्थी या हेल्पलाईनवर मदत घेऊ शकेल. ही हेल्पलाईन दिवसात २० तास सुरू राहिल, अशी माहिती उपक्रमाचे समन्वयक डॉ. सजल बंसल यांनी दिली.