नागपूर : शहरात मार्चमध्ये उसळलेल्या जातीय संघर्षानंतर यंदाच्या गणेशोत्सवावर दहशतीचे सावट घोंघावत होते. त्यामुळे पोलीस आयुक्तालयाने गणेशोत्सव काळात १० दिवस सुमारे ५ हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात केला होता. त्यामुळे सुदैवाने विसर्जन शांततेत पार पडल्याने पोलीस यंत्रणेनेही सुटकेचा निःश्वास सोडला. दुसऱ्या बाजूला ‘आभाळ भरले होते तू येताना, आता डोळे भरून आले तुला निरोप देताना’, असे म्हणत पुढच्या वर्षी लवकर येण्याची आर्जव करीत नागपूरकरांनी लाडक्या गणरायाला गुण्या गोविंदाने निरोप दिला. शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये रविवारी देखील हा उत्साह कायम होता.
गणपती विसर्जनानिमित्त गेल्या दोन दिवसांपासून ढोल ताशांच्या गजराने अवघी उपराजधानी निनादून गेली आहे. प्रतिष्ठापनेपासून भक्तांनी केलेला १० दिवसांचा पाहुणचार स्वीकारत लंबोदराने देखील शांततेचे वरदान देत निरोप घेतला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बसवलेल्या भव्य गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेने गोरेवाडा तलावाला लागून कृत्रिम तलाव निर्माण केला होता. तेथे शहरातील बहुतांश गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शनिवारी शहरातील रस्त्यांवर ‘नागपूरचा राजा’ची विसर्जन शोभायात्रा काढण्यात आली. ढोल-ताशे, लेझिम पथक, भजनी मंडळांच्या स्वयंसेवकांनी तालासुरात गणरायाला निरोप दिला.
अनंत चतुर्थदशीचा दिवस उजाडताच शनिवारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये सकाळपासूनच मंगलआरतीने पूजा-अर्चना सुरू झाली. यानंतर दुपारी मिरवणुकीला सुरुवात झाली. ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमले. पर्यावरणाचा विचार करून, अनेक मंडळांनी पर्यावरणपूरक (मातीच्या) गणरायाची स्थापना केली होती. भाविकांच्या श्रद्धेचा आदर करून महापालिकेद्वारे क्रेनच्या मदतीने विशाल मूर्तींचे विसर्जन झाले.
ग्रामीणमध्ये मात्र गालबोट
या घडामोडीत नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराठी घरून निघालेल्या एकाचा धारदार हत्याराने वार करून खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी कुही परिसरात घडली. कुही पोलीस ठाणे हद्दीत गणपती विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच सकाळी ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. रविवारी सकाळी रस्त्यावरून शेताकडे निघालेल्या एकाला नाल्यात दुचाकी पडल्याचे दिसले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. देवराव गडझाडे (५५) असे मृताचे नाव आहे. पिपळा परिसरातील बोरकर सोसायटीतले रहिवासी गडझाडे यांचे मूळ गाव कुही तालुक्यात आहे. एका नातेवाईकाचे निधन झाल्याने देवराव दुचाकीवरून कोसंबी गावाकडे निघाले होते. रस्त्यात त्यांच्यावर हल्ला झाला. सोमवारी सकाळी शेतात निघालेल्या एकाला झुडपात दुचाकी पडल्याचे आढळले. त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला. शेतीच्या वादातून ही धक्कादायक घटना घडल्याचा पोलिसांना संशय असून त्या दिशेने तपास केला जात आहे.