नागपूर: प्रकाशाचा सन असलेल्या दिवाळीतील धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहर्तावर राज्यातील अनेक भागात ग्राहकांनी सोने- चांदीच्या धातूमध्ये बनलेल्या दागिन्यांसह देवी- देवतांच्या मुर्ती आणि इतरही वस्तू खरेदीत कोट्यावधींची गुंतवणूक केली. परंतु दिवाळीनंतर आता सोने- चांदीचे दर निच्चांकीवर गेल्याने या ग्राहकांची चिंता वाढली आहे. मंगळवारी (२८ ऑक्टोंबर) सोने- चांदीचे दर काय होते? त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसु बारसला सोन्याचे दर विक्रमी उंचीवर होते. परंतु धनत्रयोदशीला सोन्याच्या दरात घसरण झाल्यावर या मुहर्तावर सोने- चांदीची खरेदीसाठी बाहेर बडलेल्या ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सोने- चांदीच्या दागिन्यांमध्ये पैसे गुंतवले. लक्ष्मीपूजनातही ग्राहकांची सराफा दुकानात गर्दी होती. परंतु दिवाळीनंतर आता सोने- चांदीच्या दरात घसरण होतांना दिसत आहे. त्यामुळे मुहर्तावर सोने- चांदीच्या धातूमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकाची चिंता वाढली आहे. दरम्यान आता दर घसरले असले तरी येत्या काळात सोने- चांदीच्या दराबाबत सराफा व्यवसायिकांकडूनही महत्वाचा अंदाज वर्तवला जात आहे.
धनत्रयोदशीला नागपुरात सोन्याचे दर (१८ ऑक्टोंबर २०२५) जीएसटी आणि मेकिंग शुल्क वगळून २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम १ लाख २८ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी १ लाख १९ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी १ लाख २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ८३ हजार ५०० रुपये होते. हे दर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (२१ ऑक्टोंबर २०२५) प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी १ लाख २९ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी १ लाख २० हजार ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी १ लाख १ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ८४ हजार २०० रुपये होते. तर आता मंगळवारी (२८ ऑक्टोंबर २०२५ रोजी) दुपारी १.३० वाजता नागपुरात सोन्याचे दर प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी १ लाख २० हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी १ लाख ११ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटसाठी ९३ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ७८ हजार १०० रुपये होते. त्यामुळे हे दर मागील काही महिन्यातील निच्चांकी दर आहे.
चांदीच्या दरातही मोठी घसरण…
नागपुरात धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीचे दर प्रति किलो १ लाख ७० हजार ५०० रुपये होते. हे दर लक्ष्मीपूजनाला २१ ऑक्टोंबरला १ लाख ६८ हजार ७०० रुपये तर आता मंगळवारी (२८ ऑक्टोंबर २०२५ रोजी) दुपारी १.३० वाजता प्रति किलो १ लाख ४५ हजार ५०० रुपये नोंदवले गेले.
